पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेविरोधात (एफटीआयआय) मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेल्या श्रीनिवास राव थमराला या विद्यार्थ्यांलाच माफी मागावी लागली. या माफीनाम्यानंतर त्याच्यावरील कारवाई मागे घेण्याचा आदेश न्यायालयाने एफटीआयआय प्रशासनाला दिला.

संस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि अभ्यासक्रमातील त्रुटींविषयी एका प्राध्यापकाशी श्रीनिवास आणि मनोजकुमार या दोन विद्यार्थ्यांनी गैरवर्तन केले होते. त्यामुळे संस्थेने या दोघांवर शिस्तभंगाची कारवाई करून निलंबित केले. या कारवाईनंतर श्रीनिवासला १५ फेब्रुवारीपर्यंत वसतिगृह सोडण्याचे आदेश प्रशासनाने दिले. मात्र, त्याने वसतिगृह न सोडल्याने १५ फेब्रुवारीच्या रात्री त्याला वसतिगृहातून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर श्रीनिवाससह अन्य विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध करत संस्थेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. अखेर काही दिवसांनी संस्थेने त्याला पुन्हा दाखल करून घेतले.

दरम्यान श्रीनिवासने मुंबई उच्च न्यायालयात संस्थेविरोधात याचिका दाखल केली होती. त्याबाबत न्यायमूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि एम. एस. कर्णिक यांनी निकाल देताना माफी मागून वाद संपवण्यास सांगितले. तसेच माफी मागितल्याचे प्रतिज्ञापत्रही लिहून देण्यास सांगितले. त्यानुसार श्रीनिवासने माफीनामा लिहून दिल्यावर न्यायालयाने एफटीआयआय प्रशासनाला संबंधित विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्याचे आदेश दिले. तसेच त्याचा चुकलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी स्वतंत्रपणे मार्गदर्शन करण्याबाबत स्पष्ट करतानाच श्रीनिवासलाही शिस्त पाळण्याची सूचना केली.