scorecardresearch

“देवांचा बाप असल्याचा साक्षात्कार त्यांना…”; ब्राह्मण महासंघाने सांगितली पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण नाकारण्याची कारणं

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गरटकरांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये आज सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे.

Sharad Pawar Pune
पवारांसोबतच्या बैठकीचं आमंत्रण ब्राह्मण महासंघाने नाकारलं (फाइल फोटो)

राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ब्राह्मण महासंघाने मात्र या बैठकीचे निमंत्रण नाकारले आहे. शरद पवारांनी मंत्री छगन भुजबळ आणि अमोल मिटकरी यांनी केलेल्या विधानांबाबत आधी भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार देण्यासंदर्भात भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी काही कारणं असल्याचं म्हटलंय.

पवारांना आमच्या नाराजीची पूर्ण कल्पना
“शनिवारी २१ एप्रिल रोजी सायंकाळी शरद पवार यांनी ब्राह्मण संस्थांना भेटायला बोलवले आहे. गेल्या ४० वर्षांमध्ये पवार यांनी पहिल्यांदाच असं चर्चेला बोलावलं आहे. ज्यांच्या मध्यस्थीने निरोप आले आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वांनी येऊन तुमच्या नाराजीच कारण पवारांना सांगावं. मात्र पवारांना आमच्या नाराजीची पूर्ण कल्पना आहे,” असं दवे यांनी म्हटलंय.

केतकी चितळेप्रकरणावरुनही केलं भाष्य…
“केतकी चितळे पूर्णतः चुकली. पण आपण सुद्धा तिच्यावर टिकाच केली. पवारांनी केतकीला माफ करून जर गुन्हे मागे घेण्यास सांगितलं असतं तर ते खूप मोठे झाले असते,” असंही दवे यांनी म्हटलंय. “केतकीवर २८ ठिकाणी गुन्हे दाखल केलेल्या पोलिसांनी मिटकरी यांच्यावर मात्र एकही गुन्हा नोंदवला नाही,” असंही दवे म्हणालेत.

पुरंदरेंवर टीका
“तुमच्या आंदोलननंतर राज्यभर समाज जागा झाला. पण तरीही त्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. (दिवंगत माणसावर टीका करत नाहीत शक्यतो कोणीच.) काही संस्था निश्चितच या बैठकीला जात आहेत. त्यांना शुभेच्छा. इतरांनी काय करावे हे आपण कधीच सांगत नाही,” असंही दवे म्हणाले. “आपली भूमिका ठरवण्याआधी मी स्वतः सर्व विश्वस्त, कार्याध्यक्षांबरोबर बोलून त्यांची पण मते जाणून घेतली. आज प्रवासात सुद्धा आपल्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा केली त्यांना सुद्धा हेच पटत आहे,” असंही दवे म्हणाले.

राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतात
“आमचा पवारांना व्यक्तिगत काहीच विरोध नाही. त्यांच्या मतदार संघातील ब्राह्मण समाजसुद्धा त्यांच्यावर नाराज असल्याच फारसे ऐकीवात नाही पण राजकीय फायद्यासाठी ते ब्राह्मण समाजाचा वापर करतातं हे निश्चित,” असा आरोप दवे यांनी केलाय. “त्यांनी मिटकरी, भुजबळ यांची वक्तव्यांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट करावी एवढीच अपेक्षा आहे,” अशी मागणीही त्यांनी केलीय.

अन्य राजकीय पक्ष गप्प बसले
“अर्थात ज्या ज्या वेळेस पवार किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जातीय उल्लेख केले आहेत त्या वेळेस अन्य राजकीय पक्षसुद्धा मूग गिळून गप्प असतात हे सुद्धा तितकेच दुर्दैवी सत्य आहे,” असा टोलाही दवेंनी लगावलाय.

देवांचा बाप असल्याचा साक्षात्कार
“समर्थ रामदास, कोंडदेव, गडकरी पुतळे,पुणेरी पगडी, संभाजी ब्रिगेड, श्रीमंत कोकाटे, बाबासाहेब पुरंदरे हे जुने विषय जरा बाजूला ठेवू पण अगदी परवाच्या प्रकरणानंतर त्यांनी मिटकरींना शब्द माघारी घ्यायला सांगायला हवं होतं. पण उलट दुसऱ्या दिवशी त्यांनी शाहू महाराज आणि ज्योतिष यांची गोष्ट सांगितली. त्याच व्यासपीठावर त्यांच्याच उपस्थितीत भुजबळ यांनी पुरोहित हे धंदा करतात (व्यवसाय नाही) हा शब्द वापरत पुन्हा टिंगल केली. तसेच आरक्षणाचं चुकीचं उदाहरणं दिले,” असंही दवे यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली. “देवांचा बाप असल्याचा साक्षात्कार त्यांना झाला तो पण अगदीच काल, परवा,” असा टोलाही दवे यांनी लगावला.

कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नाही
“प्रदीप गारटकर यांच्या माध्यमातून ही बैठक होत आहे. ते सर्व ब्राह्मण संस्थांबरोबर संपर्क ठेवून असतात. त्यांच्याविषयी आपल्याला आदर आणि सन्मानच आहे. मात्र पवारांना सार्वजनिक व्यासपीठावर भेटण्याची ही वेळ नाही. त्यातून दुरावा आणखी वाढेल असं आम्हाला वाटतं. म्हणूनच ब्राह्मण महासंघचा कोणताही पदाधिकारी या बैठकीला जाणार नाही,” असं दवे यांनी स्पष्ट केलं आहे.

बैठक कुठे होणार?
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गरटकरांच्या पुढाकारातून ही बैठक मार्केटयार्ड परिसरातील निसर्ग मंगल कार्यालयामध्ये आज सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे. या बैठकीत २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहणार आहेत. बैठकीसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीने बैठकीला येणाऱ्यांनी आपल्याबरोबर पेन आदी वस्तू आणण्यास मनाई करण्यात आलीय. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळेल, असा दावा गारटकर यांनी केलाय.

राष्ट्रवादीचं म्हणणं काय?
दरम्यान, राजकीय पक्ष समाजातील प्रत्येक घटकाबरोबर काम करत असतो. सध्या राज्यातील राजकीय वातावरण काहीसे दूषित झाले आहे. राष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान असलेल्या ब्राह्मण समाजाच्या मनातील गैरसमज दूर करणे हा या बैठकीचा उद्देश आहे. राज्यातील बहुतांश ब्राह्मण संघटनांना त्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. काही संघटना राजकीय पक्षांशी संबंधित आहे. त्यामुळे त्यांना यामध्ये राजकारण वाटत आहे. मात्र संवाद साधणे आणि समाजातील वातावरण सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून केला जाणार आहे, असं गारटकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anand dave brahman mahasangh slams sharad pawar and ncp svk 88 scsg