पुणे : ‘मिळेल त्या भूमिकेचे सोने करणाऱ्या अनंतराव जोशी यांचे रंगभूमीवरील योगदान विसरता येणार नाही. जोशी यांचे चरित्र केवळ वैयक्तिक नाही, तर त्यांच्या अनुभवांतून त्या काळच्या रंगभूमीचे, कलावंतांचे, समाजाचे आणि रसिकांचे दस्तावेजीकरण झाले आहे,’ असे मत ज्येष्ठ रंगकर्मी अभिराम भडकमकर यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
‘रसिक आंतरभारती’च्या वतीने ज्येष्ठ रंगकर्मी अनंतराव जोशी यांच्या जीवनावर आधारित ‘नाटकवाला’ या पुस्तकाचे प्रकाशन भडकमकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत, अंजली धारू, ज्येष्ठ रंगकर्मी प्रसाद वनारसे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. संपदा जोशी, पुस्तकाचे शब्दांकन करणारे प्रवीण जोशी, प्रकाशक शैलेश नांदुरकर या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘नाटकवाला’ या पुस्तकातील काही भागांचे अभिवाचन झाले.
भडकमकर म्हणाले, ‘जोशी यांनी प्रमुख भूमिकाच हवी, असे न मानता जी भूमिका मिळेल, तिचे सोने केले. त्यांनी अभिनयासह नाट्य व्यवस्थापन, निर्मितीवरही प्रभुत्व मिळवले. रंगभूमीबरोबरच त्यांनी केलेले सामाजिक, शैक्षणिक कार्यातही मोठे योगदान दिले. ‘नाटकवाला’ हे पुस्तक म्हणजे जोशी यांच्या योगदानाला केलेले अभिवादन आहे.’ वनारसे म्हणाले, ‘धाडसी आणि शांतपणाचाही दरारा वाटावा, असे आयुष्य जगणाऱ्या जोशी यांच्यासारख्या रंगकर्मीच्या जीवनप्रवासाचे कथन मराठी संस्कृतीच्या, समाजाच्या, राजकीय-सामाजिक, सांस्कृतिक इतिहासाविषयी भाष्य करणारे आहे.’अक्षय वाटवे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश नांदूरकर यांनी आभार मानले.