स्वच्छतेविषयक बाबींची काळजी घेतल्यास भारतासारखा देश जगात नाही, अशी भावना केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाच्या सदिच्छादूत व खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवतयांनी पिंपरीत व्यक्त केली. जागोजागी थुंकणारे, विनाकारण अस्वच्छता करणाऱ्यांना दंड आकारलाच पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भागवत पिंपरी पालिकेत आल्या होत्या. महापौर शकुंतला धराडे व आयुक्त राजीव जाधव यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, खेळाच्या निमित्ताने सगळे जग फिरले, भारतासारखा जगात देश नाही, अशी आपली खात्री झाली आहे. आपल्याकडे सर्वकाही आहे. मात्र, आपल्याला त्याची किंमत नाही. स्वच्छतेच्या बाबतीत अक्षम्य बेजबाबदारपणा दिसून येतो. रस्त्यांवर विधी केले जातात, परदेशी पर्यटक मोठय़ा संख्येने आपल्याकडे येतात, त्यांना काय वाटत असेल. आपल्याकडे कायद्याचा बडगा असल्याशिवाय काही गोष्टी होत नाहीत. त्यामुळे अस्वच्छता करणाऱ्यांकडून दंड आकारणी झाली पाहिजे. िपपरी-चिंचवड खूप सुंदर शहर आहे. स्वच्छता अभियानासाठी पालिकेने चांगला पुढाकार घेतला आहे. कचरा रस्त्यावर येऊ नये, याची खबरदारी घेतली पाहिजे. कचऱ्यामुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढतो, रोगराई वाढते. खेळाडू म्हणून असलेल्या आमच्या लोकप्रियतेचा उपयोग जनजागृतीसाठी व्हावा, या हेतूने या चळवळीत सहभागी झाले आहे. पालक जागरूक असल्यास मुलांमध्येही स्वच्छतेची आवड निर्माण होईल. स्वच्छतेच्या माध्यमातून निरोगी समाज तयार होईल, असे भागवत यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anjali bhagwat insist on swachha bharat abhiyaan
First published on: 01-01-2016 at 03:24 IST