पुणे : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुई न टोचताही रक्तातील साखरेवर देखरेख करणाऱ्या ‘अगस्ता साॅफ्टवेअर प्रा. लि.’ने विकसित केलेल्या ‘ईझी टच प्लस’ या उपकरणाला यंदाचा अंजनी माशेलकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोबाइलप्रमाणे खिशात मावणारे आणि केवळ त्यावर बोट ठेवल्यावर १५ सेकंदांत रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण सांगणारे हे उपकरण मधुमेहाची राजधानी झालेल्या भारतासाठी क्रांतिकारी ठरेल.

पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने आयोजित १३व्या सामाजिक नवनिर्माण (सोशल इनोव्हेशन) राष्ट्रीय परिषदेत टाटा ट्रस्टचे मख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ शर्मा आणि अंजनी माशेलकर फाउंडेशनचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘ईझी टच प्लस’चे संशोधक राहुल रस्तोगी आणि नेहा रस्तोगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रस्तोगी दाम्पत्याला यापूर्वी त्यांच्या ईसीजी मोजणाऱ्या ‘संकेत लाइफ’ या उपकरणासाठी २०१५ मध्ये अंजनी माशेलकर पुरस्कार मिळाला होता.

या उपकरणाविषयी डाॅ. माशेलकर म्हणाले, ‘भारताला आरोग्य क्षेत्रात काय पाहिजे हे अशी उपकरणे दाखवून देत आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान, स्वस्त आणि वापरण्यासाठी सोपे असे ‘ईझी टच प्लस’ हे नवनिर्माण आहे. सातत्याने अशी नवनवीन उपकरणे शोधणाऱ्या रस्तोगी दाम्पत्याला अंजनी माशेलकर पुरस्काराने सन्मानित करताना अभिमान वाटतो. भारतासमोरची मोठी आव्हाने पेलण्यासाठी आणि सोडविण्यासाठी युवा संशोधक पुढे येत आहेत, ही बाब आनंददायक आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेसाठी ‘ईझी टच प्लस’ला फाउंडेशन सर्वतोपरी मदत करेल.’

डाॅ. रघुनाथ माशेलकर यांनी आपल्या मातोश्रींच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या अंजनी माशेलकर फाउंडेशनने आतापर्यंत गरिबांना परवडेल, अशा किमतीत आणि वापरण्यासाठी सोप्या अशा आरोग्यसेवा पुरविणाऱ्या उपकरणांच्या १५ नवनिर्माणांना पुरस्कृत केले आहे.

काय आहे हे उपकरण?

भारतामध्ये मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण असून, त्याचे प्रमाणही वाढत आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण सातत्याने तपासत राहण्याची गरज असताना पॅथाॅलाजी सेंटरला जाऊन सुई टोचून घेत कायम रक्तातील साखर मोजत राहण्याचा रुग्ण कंटाळा करतात. ‘ईझी टच प्लस’ उपकरणामुळे वेदनादायी, खर्चीक उपायांवर मात केली जाईल. खिशात मावणारे आणि अगदी अचूकपणे ग्लुकोज माॅनिटरिंग आणि ट्रॅकिंग करणारे हे उपकरण मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरेल. इतर वेळेला रक्त तपासणीसाठी जितका खर्च येतो, त्याच्या एक शंभरांश खर्चात म्हणजे केवळ २५ पैशांत हे उपकरण वेदना न देता रक्तातील साखरेचे प्रमाण अचूकपणे मोजते.