कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्टचा रौप्यमहोत्सव आणि ज्येष्ठ भरतनाटय़म नृत्यांगना-गुरु डॉ. सुचेता चापेकर यांच्या नृत्य कारकिर्दीचा सुवर्णमहोत्सव असे दुहेरी औचित्य साधून शनिवारपासून (२८ सप्टेंबर) दोन दिवसांचा ‘परिक्रमा’ हा वार्षिक नृत्यमहोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
बालगंधर्व रंगमंदिर येथे २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता आर्मेल चोकार्ड, जोझिएन, ज्योतिका, जेसमिंदा आणि पॉलिन या सुचेताताईंच्या फ्रेंच शिष्यांचा समावेश असलेल्या नृत्य कलाकारांच्या ‘अघ्र्यम्’ या भरतनाटय़म आविष्काराने महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अमेरिकेतील ज्येष्ठ शिष्या आसावरी देवाडिगा यांच्या नृत्यगंगा सादरीकरणानंतर चेन्नईच्या शिजिथ आणि पार्वती नंबियार या दांपत्याच्या भरतनाटय़म नृत्याविष्काराने या सत्राची सांगता होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या अरुंधती पटवर्धन यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय विद्या भवन येथे रविवारी (२९ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता होणाऱ्या संवाद कार्यक्रमामध्ये पद्मिनी गणेश, आर्मेल चोकार्ड, स्वाती सिन्हा आणि शिजिथ नंबियार हे शास्त्रीय नृत्याशी संबंधित पारंपरिक आणि समकालीन मुद्दय़ांविषयी चर्चा करणार आहेत. सत्यजित तळवलकर आणि कलाकारांचा सहभाग असलेल्या ‘तालवाद्य कचेरी’ या कार्यक्रमाने यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे रात्री साडेआठ वाजता दुसऱ्या सत्राचा आरंभ होणार आहे. दिल्ली येथील स्वाती सिन्हा यांच्या कथक नृत्याविष्कारानंतर डॉ. सुचेता चापेकर यांच्या नृत्याने या महोत्सवाची सांगता होणार आहे.