अनेक तरुणांची नोकरी लावण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या किरण गोसावी विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. परदेशात हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी लावतो असे म्हणून भोसरी परिसरातील विजयकुमार सिद्धलिंग कानडे या तरुणाची २ लाख २५ हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसात त्यांनी फिर्याद दिली असून आरोपी किरण गोसावीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विजयकुमार कानडे यांनी २०१५ ला नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज केला होता. तेव्हा, त्यांना वेगवेगळ्या जॉब पोर्टल साईट्सवरून नोकरीच्या ऑफर येत होत्या. त्याच वेळी शिवा इंटरनॅशनल यांच्याकडून २१ मार्च २०१५ ला फिर्यादी यांच्या मेल आयडीवर नोकरीसंदर्भात मेल आला. त्या मेलमध्ये परदेशात हॉटेल मॅनेजमेंटची नोकरी असल्याची माहिती दिली होती. तेव्हा तात्काळ फिर्यादीने त्यांचा बायोडेटा पाठवला.

हेही वाचा – किरण गोसावीने समीर वानखेडेंना फोन केला; सॅम डिसुझाला ३८ लाख रुपये दिले – प्रभाकर सईल

विजयकुमार यांचा विश्वास संपादन करून परदेशात नोकरी लावतो असे सांगून आरोपी किरण गोसावीने विजयकुमार यांच्याकडून नाशिक फाटा येथे ३० हजार घेतले. त्यानंतर शिवा इंटरनॅशनल यांच्या लेकसिटी मॉल, घोडबंदर रोड, माजीवाडा, ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन दिनांक ५ एप्रिल २०१५ रोजी रोख ४० हजार हजार भरले होते, असं फिर्यादीत म्हटले आहे.

तसेच किरण गोसावी यांच्या सांगण्यावरून फिर्यादी यांनी आयसीआयसीआय बँकेच्या खात्यात २० हजार पाठवले होते. त्यानंतर ठाणे येथील ऑफिसमध्ये जाऊन १० हजार भरले होते. विजयकुमार यांच्याकडून वेळोवेळी आणि ऑनलाइन पद्धतीने एकूण २ लाख २५ हजारांची फसवणूक केली असल्याचं फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.