Apple प्रेमींसाठी मोबाईल म्हणजे iPhone इतकं साधंसरळ गणित ठरलेलं आहे. त्यामुळे iPhone संदर्भात कोणतीही अपडेट किंवा माहिती असली, तरी Apple प्रेमींचे कान हमखास टवकारतात. पुण्यातील अशाच आयफोनप्रेमींसाठी अॅपलकडून एक मोठी अपडेट देण्यात आली आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क भागातील अॅपलच्या स्टोअरचं लवकरच उद्घाटन होणार आहे. कंपनीकडून उद्घाटनाचा मुहूर्त ठरवण्यात आला असून त्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात आयफोनप्रेमींना त्यांच्या फोनसंदर्भातील सर्व प्रकारच्या सेवा उपलब्ध होणार आहेत.
कधी होणार Apple Koregao Park चं उद्घाटन?
अॅपलकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या पुण्यातील स्टोअरचं उद्घाटन येत्या ४ सप्टेंबर रोजी म्हणजे पुढच्या आठवड्यात गुरुवारी दुपारी १ वाजता होणार आहे. गेल्या आठवड्यातच अॅपलनं बंगळुरूतील स्टोअरच्या उद्घाटनाची घोषणा केली होती. त्यानंतर आता पुण्यातील स्टोअरसंदर्भात अॅपलकडून घोषणा करण्यात आली आहे. बंगळुरू आणि पुणे हे कंपनीचे भारतातील अनुक्रमे तिसरे आणि चौथे स्टोअर आहे.
Apple चे पदाधिकारी उद्घाटनासाठी पुण्यात
दरम्यान, इंडियन एक्स्प्रेसनं अॅपलमधील सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेतील अॅपलचे पदाधिकारी स्टोअरच्या उद्घाटनासाठी पुण्यात उपस्थित राहणार आहेत. हे स्टोअर जवळपास १० हजार चौरस फूट आकाराचं आहे. अॅपलच्या जगभरातील इतर स्टोअर्सप्रमाणेच पुण्यातील हे स्टोअरदेखील तळमजल्यावरच असणार आहे.
४ सप्टेंबर रोजी पुण्यात कोरेगाव पार्क येथे स्टोअरचं उद्धाटन होण्याआधी २ सप्टेंबर रोजी बंगळुरूतील स्टोअरचं उद्धाटन केलं जाणार आहे. त्यामुळे दोन दिवसांच्या फरकाने भारतातील दोन स्टोअर्सचं उद्घाटन होणार आहे. बंगळुरूच्या बेल्लारी रोड भागातील फिनीक्स मॉलमध्ये हे स्टोअर सुरू करण्यात आलं आहे.
भारतातील पहिलं स्टोअर मुंबईत!
अॅपलनं भारतातील पहिलं स्टोअर दोन वर्षांपूर्वी मुंबईत सुरू केलं होतं. मुंबईच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स अर्थात बीकेसीमधील जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये हे स्टोअर सुरू झालं होतं. या स्टोअरच्या उद्घाटनासाठी खुद्द अॅपलचे सीईओ टिम कूक व वरीष्ठ उपसंचालक डिएर्दे ओब्रायन हे उपस्थित होते.