‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण तशी सर्वश्रुत ठरली आहे! पण Apple च्या दृष्टीने या शहरात एक उणीव होती ती म्हणजे त्यांच्या कंपनीच्या रिटेल स्टोअरची. ती उणीवही कंपनीनं आता भरून काढली असून लवकरच म्हणजे अगदी पुढच्याच आठवड्यात पुण्यात Apple चं शहरातलं पहिलंवहिलं स्टोअर सुरू होणार आहे. येत्या ४ सप्टेंबर रोजी या स्टोअरचं उद्घाटन होणार असून त्यासाठी कंपनीची वरीष्ठ मंडळी पुण्यात डेरेदाखल होतील. यानिमित्ताने कंपनीच्या सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट देइरद्रे ओब्रायन यांनी ‘लोकसत्ता’शी खास बातचित केली. यावेळी त्यांनी पुण्यातील स्टोअरबद्दल सांगतानाच पुण्याचं कौतुकदेखील केलं आहे.

शहरातलं पहिलं Apple स्टोअर, पण कुठे?

४ सप्टेंबर रोजी दुपारी १ च्या सुमारास पुण्यात अ‍ॅपलच्या पहिल्या स्टोअरचं उद्घाटन होणार आहे. त्यासाठी कंपनीचे अमेरिकेतील पदाथिकारी पुण्यात येणार आहेत. पुण्याच्या कोरेगाव पार्क भागात Apple Koregao Park चं उद्घाटन होणार आहे. जवळपास १० हजार चौरस फूट आकाराचं हे स्टोअर असेल. याआधी दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या बीकेसीमध्य अ‍ॅपलनं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू केलं होतं. नुकतीच कंपनीनं बंगळुरूच्या बेल्लारी रोड परिसरात दुसरं स्टोअर सुरू केलं असून २ सप्टेंबर रोजी त्याचं उद्घाटन होणार आहे. आता पुण्यातील स्टोअरच्या रुपाने अ‍ॅपलचे देशात तीन स्टोअर होणार आहेत.

काय म्हणाल्या ओब्रायन?

दरम्यान, स्टोअर सुरू करण्यासाठी पुण्याची निवड का केली? यासंदर्भात ओब्रायन यांनी लोकसत्ताला माहिती दिली. “पुणे हे देशाचं सांस्कृतिक केंद्र असून शिक्षणाचंही एक मोठं केंद्रस्थान आहे. त्याशिवाय, पुण्यातील विद्यार्थी व कल्पक व्यक्ती भवतालाविषयी जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर करतात”, असं त्या म्हणाल्या.

“बंगळुरूतील Apple Hebbal आणि पुण्यातील Apple Koregaon Park या दोन स्टोअर्सच्या उद्घाटनामुळे भारतात कंपनीच्या विस्ताराचा महत्त्वपूर्ण पाया रचला गेला आहे. भारतातील आणखी ग्राहकांपर्यंत पोहोचता येण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. अ‍ॅपल ज्या प्रकारच्या सेवांसाठी ओळखलं जातं, त्या सेवा या शहरांमधल्या ग्राहकांना देण्यासाठी आम्ही प्रचंड उत्सुक आहोत”, असंही ओब्रायन यांनी नमूद केलं.

“भारतीय ग्राहकांना तंत्रज्ञानाची आवड”

दरम्यान, यावेळी भारतीयांच्या तंत्रज्ञानप्रेमाचीही ओब्रायन यांनी दखल घेतली. “२०२३ साली Apple चं पहिलं स्टोअर भारतात (मुंबई बीकेसी) सुरू झालं. तेव्हापासून भारतीयांचं तंत्रज्ञानप्रेम आम्ही पाहात आलो आहोत. त्यामुळे बंगळुरू आणि पुण्यातील आमच्या नवीन स्टोअर्समध्ये अशा भारतीय ग्राहकांच्या स्वागतासाठी आम्ही उत्सुक आहोत. इथे त्यांना आमची उत्पादने, सेवा आणि आमच्या कंपनीतील निष्णात सहकाऱ्यांकडून शक्य ती सर्व मदतीचा अनुभव घेता येईल”, अशा शब्दांत ओब्रायन यांनी त्यांचं मत व्यक्त केलं.

Apple चा निसर्गाभिमुख दृष्टीकोन

ओब्रायन यांनी यावेळी बोलताना अ‍ॅपलकडून ठेवण्यात आलेल्या निसर्गाभिमुख दृष्टीकोनाविषयी माहिती दिली. विशेषत: मुंबईच्या बीकेसीमधील स्टोअर हे त्यांच्या जगभरातील इंधनाची बचत करणाऱ्या सर्वोत्तम स्टोअरपैकी एक असल्याचं त्यांनी नमूद केलं. बीकेसीतील या स्टोअरमध्ये कोणत्याही प्रकारच्या जीवाश्म इंधनाचा वापर केला जात नाही, हे त्यांनी अधोरेखित केलं.

“आम्ही जिथे कुठे आमची सेवा देतो, तिथे ग्राहकांना सहजसुलभ आणि उत्तम सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. त्यासाठी वेगवेगळ्या कल्पक गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आमचा कोणताही ग्राहक स्टोअरमध्ये आला, तर त्याला आपण स्पेशल आहोत अशी जाणीव व्हायला हवी”, असंही त्यांनी नमूद केलं.