महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया उद्यापासून (२९ मे) सुरू होणार आहे. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली. बारावीच्या पुरवणी परीक्षेस पुनर्परीक्षार्थी, या पूर्वी नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणाऱ्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन अर्ज घेण्यात येणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांना www.mahahsscboard.in या संकेतस्थळाद्वारो अर्ज भरावा लागेल. हेही वाचा >>> Video: गोष्ट पुण्याची- सावरकरांची फर्ग्युसनमधील खोली ते विदेशी कपड्यांची होळी! फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना त्यांची या परीक्षेतील माहिती अर्जात ऑनलाइनद्वारे घेता येणार आहे. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२३ आणि फेब्रुवारी-मार्च २०२४ या दोनच संधी उपलब्ध असतील. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याबाबत माहिती : - नियमित शुल्क भरून अर्ज करणे : २९ मे ते ९ जून - विलंब शुल्क भरून अर्ज करणे : १० जून ते १४ जून - उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बॅंकेत चलनाद्वारे शुल्क भरणे : १ ते १५ जून - उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करणे : १६ जून