पुणे : लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी – आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज) संचालक आणि कमांडंट पदावर लेफ्टनंट जनरल राजश्री रामसेतू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ले. जनरल रामसेतू या एएफएमसीच्या माजी विद्यार्थिनी आहेत. १७ डिसेंबर १९८३ ला त्या लष्करी वैद्यकीय सेवेत दाखल झाल्या. लष्करी वैद्यकीय सेवेतील सर्वोत्तम मूत्रपिंड विकार तज्ज्ञ (नेफ्रॉलॉजिस्ट) म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

तब्बल ३८ वर्षांच्या लष्करी वैद्यकीय सेवेत ले. जनरल रामसेतू यांनी मुंबईतील आयएनएस अश्विनी, कोलकाता आणि चेन्नईतील कमांड हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

नवी दिल्ली येथील लष्करी वैद्यकीय सेवा महासंचालक कार्यालयाच्या वरिष्ठ सल्लागार तसेच लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातील वैद्यकीय सेवा विभागात मेजर जनरल म्हणून कामाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. लष्करी वैद्यकीय सेवेतील त्यांच्या योगदानासाठी लष्कर प्रमुखांच्या प्रशस्तिपत्राने (चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमेंडेशन) १९९५, २०११ आणि २०१७ मध्ये त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

लेफ्टनंट जनरल राजश्री रामसेतू