जायका कंपनी आणि केंद्र सरकारकडून निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब, काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा
पुणे : बहुचर्चित आणि गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या मुळा-मुठा नदी सुधार योजनेच्या निविदांना जपानमधील जायका कंपनी आणि केंद्र सरकारने मान्यता दिल्याने योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. योजना सुरू करण्यामधली सर्व अडथळे दूर झाल्याने काम सुरू करण्यास मान्यता मिळाली असून जायका कंपनीकडून तसे पत्र महापालिकेला देण्यात आले आहे. दरम्यान, निविदा स्थायी समितीच्या माध्यमातून मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून पाठपुरावा सुरू झाला आहे.
योजनेच्या कामाला मुदतवाढ देण्याचे केंद्र सरकारने निश्चित केल्यानंतर महापालिकने जायकाच्या परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यावर जायका कंपनीकडून सकारात्मक भूमिका घेत निविदा प्रक्रिया सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तातडीने प्रक्रिया सुरू करून आर्थिक वर्षांत योजनेचे काम सुरू करावे, असे पत्र जायका कंपनीने महापालिकेला दिले आहे. जायका आणि केंद्र सरकारने या योजनेला मान्यता दिल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत असलेल्या मुळा-मुठा नदीचे प्रदूषण नियंत्रण करण्याच्या कामाच्या (जायका) निविदा प्रक्रियेची अंतिम मान्यता बाकी होती. निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केल्याने आता स्थायी समितीतही योजनेला मान्यता दिली जाईल, असे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
योजना का लांबली
महापालिका, केंद्र सरकार आणि जायका यांच्या त्रिपक्षीय करार फेब्रुवारी २०१५ मध्ये करण्यात आला. त्यानुसार शहरात ११ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि सांडपाणी वितरण व्यवस्था उभी करण्यासाठी ९९० कोटींच्या खर्चापैकी ८५ टक्के अनुदान म्हणजे ८४१ कोटी रुपये महापालिकेला मिळणार आहेत. राष्ट्रीय नदी संवर्धन मंत्रालयाने आणि जपान सरकारच्या मदतीने हे काम होणार आहे. योजनेसाठी आवश्यक ११ पैकी ५ जागा महापालिकेच्या ताब्यात आलेल्या नाहीत. त्यात निविदा प्रक्रियाही महापालिकेला मुदतीमध्ये पूर्ण करता आली नाही, त्यामुळे योजना लांबली होती. ५५ किलोमीटर लांबीच्या मोठय़ा व्यासाच्या सांडपाणी वाहिन्या या योजने अंतर्गत टाकण्यात येणार आहेत.
सन २०१७ मध्ये नद्या पुनरूज्जीवीत करण्याचे आश्वासन भाजपने दिले होते. ते पूर्ण होणार आहे. निविदा प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्या सर्व दूर करण्या आल्या आहेत. नद्यांचे प्रदुषण रोखण्यासाठी योजना उपयुक्त ठरणार असून लवकरच योजनेअंतर्गत कामांना सुरुवात होईल. – मुरलीधर मोहोळ, महापौर
योजनेच्या कामाला गती मिळावी यासाठी केलेल्या पाठपुराव्यास यश मिळाले आहे. योजनेच्या कंत्राटाची प्रक्रिया पूर्ण करून कामे आता सुरू होतील. योजनेचा निधी पुन्हा जातो की का, अशी शक्यता असताना सातत्याने बैठका घेऊन योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. – गिरीश बापट, खासदार