प्राणीदंशाद्वारे होणाऱ्या ‘रेबिज’ या आजाराच्या निर्मूलनासाठी उपाय सुचवण्यासाठी ‘असोसिएशन फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ रेबिज इन इंडिया’ या संस्थेतर्फे ‘अॅप्रिकॉन’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ६ व ७ जुलैला ही परिषद हॉटेल हयात रीजन्सीमध्ये होणार आहे.
देशात दरवर्षी दीड कोटीहून अधिक लोकांना प्राणीदंश होत असून त्यात ९५ टक्के वाटा श्वानदंशांचा तर पाच टक्के वाटा कोल्हा व मार्जारकुळातील प्राण्यांमुळे झालेल्या दंशांचा असतो. दरवर्षी वीस हजार लोक या दंशामुळे मृत्युमुखी पडत असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आली.
प्राणीदंशाचे प्रमाण कमी करण्यासाठी रस्त्यावरील कुत्र्यांची संख्या नियंत्रित करणे, पाळीव प्राण्यांचे लसीकरण व नोंदणी आणि स्थानिक स्वराज्य संस्था, आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या एकत्रित प्रयत्नांतून प्राणीदंश झालेल्यांना वेळेवर लसीकरण हे उपाय संस्थेतर्फे सुचवण्यात आले आहेत. रेबिजचे २०२० सालापर्यंत समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने या क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेत आपल्या अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत.