जुन्या हद्दीतील रिंग रोडसाठी भूसंपादन सुरू करण्याची सूचना

शहराच्या जुन्या हद्दीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोडसाठी जी जागा आवश्यक आहे त्याचे भूसंपादन तत्काळ सुरू करण्यासंबंधीच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिल्या.

शहराच्या जुन्या हद्दीसाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोडसाठी जी जागा आवश्यक आहे त्याचे भूसंपादन तत्काळ सुरू करण्यासंबंधीच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिल्या. राज्य सरकारचे विविध विभाग आणि अखत्यारितील संस्थांकडून रिंग रोडसाठी या जागा घेतल्या जाणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.
उच्च क्षमता जलद गती मार्ग (हाय कपॅसिटी मास ट्रान्झिट रूट – एचसीएमआरटी) तयार करून पुण्यातील वाहतूक व्यवस्था गतिमान कशी करता येईल याबाबत विचार करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापटांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक झाली. पालक सचिव डॉ. नितीन करीर, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, महापालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजीव जाधव, विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, अतिरिक्त प्रदीप पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता डी. वाय. पाटील या वेळी उपस्थित होते.
गिरीश बापट म्हणाले, शहरातील वाहतूक गतिमान होण्यासाठी रिंग रोडसारखे प्रकल्प होण्याची आवश्यकता आहे. मात्र, याबाबत र्सवकष विचार झाला पाहिजे. त्यासाठी पीएमआरडीएने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिकांशी समन्वय ठेवून प्रकल्प गतीने कार्यान्वित कशा पद्धतीने करता येईल याचा विचार करावा. राज्य सरकारचे विविध विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच केंद्र सरकारच्या ताब्यातील जमिनी प्रकल्पासाठी संपादित करण्याची कार्यवाही करावी. त्याचबरोबर औंध येथे लष्कराच्या ताब्यातील जमिनी मिळविण्यासाठी संरक्षण मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जावा.
शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यानच्या ट्रान्झिट सिस्टिमचे या वेळी सादरीकरण करण्यात आले. साडेसतरा किलोमीटरच्या या प्रकल्पाचे कामकाज खासगी लोकसहभाग (पीपीपी) धोरणानुसार करण्याचे प्रस्तावित आहे. या प्रकल्पामुळे हिंजवडीकडे जाणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीवर तोडगा निघू शकेल, असेही बापट यांनी सांगितले. बापट यांनी पीएमपीएमएलच्या कामकाजाचा आढावा घेतला. दररोजच्या तोटय़ात कपात करण्याकडे लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया आणि व्यवस्थापक राजेंद्र मदने यांना केल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Aquire land for ring road girish bapat