पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) होळकरवाडी नगररचना योजनेसाठी राज्य सरकारने लवादाची नियुक्ती केली आहे. त्यामुळे या नगररचना योजनेवरील हरकतींवर सोमवारपासून (१७ ऑक्टोबर) लवादामार्फत सुनावणी प्रक्रिया सुरू होणार आहे.
‘पीएमआरडीए’ने पहिल्या टप्प्यात सहा नगररचना योजनांचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी म्हाळुंगे-माण नगररचना योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे म्हाळुंगे माणनंतर पीएमआरडीएने होळकरवाडी नगररचना योजना क्रमांक चार मार्गी लावण्याची तयारी केली आहे. होळकरवाडी येथे नगररचना क्रमांक चार आणि पाच प्रस्तावित आहेत. योजना क्र. चार ही १५८ हेक्टरवर प्रस्तावित आहे. गेल्या वर्षी पीएमआरडीएने या नगररचना योजनेचे प्रारूप जाहीर केले होते. मात्र, त्यावर नागरिकांच्या हरकतींची सुनावणी घेण्यासाठी लवादाची नेमणूक केली नव्हती. गेल्या महिन्यात मा. द. राठोड यांची लवाद म्हणून नियुक्ती झाली. त्यामुळे पीएमआरडीएने होळकरवाडी नगररचना योजना क्र. चारमधील नागरिकांची सुनावणी प्रक्रिया कार्यक्रम जाहीर केला आहे.
हेही वाचा >>> विद्यापीठ शुल्कवाढ विरोधातील आंदोलन स्थगित
दरम्यान, सुनावणीचा तपशील पीएमआरडीएच्या http://www.pmrda.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच होळकरवाडी नगररचना योजना क्र. चार येथील पूर्वीच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीमध्ये जाहीर सूचनादेखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुनावणी कार्यक्रमानुसार नागरिकांनी नियोजित तारीख आणि वेळेत पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले आहे.
सुनावणी चार टप्प्यांत होळकरवाडी नगररचना योजनेवरील सुनावणी १७ ते २० ऑक्टोबर, ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर आणि ९ ते ११ नोव्हेंबर या चार टप्प्यांत होणार आहे. त्यानंतर लवादामार्फत ही योजना अंतिम करण्यात येणार आहे. योजनेत जमिनी गेलेल्या तसेच वाटपात मिळालेल्या भूखंडासह काही तक्रारी असल्यास त्याची नोंद सुनावणीदरम्यान घेतली जाणार आहे.