पुण्यातील वृक्षतोडीच्या महत्त्वाच्या प्रकरणात पुणे महापालिकेच्या बेजबाबदार वर्तनाबद्दल राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणाच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल पालिकेच्या उद्यान विभागाचे वृक्ष अधिकारी मोहन ढेरे यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले आहे. ढेरे पुढच्या सुनावणीला हजर राहिले नाहीत तर पालिका आयुक्तांवर कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.
पुण्यातील वृक्षतोडीबाबत विनोद जैन विरुद्ध महाराष्ट्र सरकार व इतर या प्रकरणातील सुनावणी सध्या राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणापुढे सुरू आहे. या प्रकरणात याआधी पुणे महापालिकेचे वकीलपत्र घेतलेले समीर खळे यांनी खटल्यातून माघार घेतली आहे. दुसरे वकील आले आहेत, पण त्यांच्याकडे वकीलनामा नाही. त्यामुळे ते कोणासाठी न्यायालयात बाजू मांडत आहेत, हे स्पष्ट होत नाही. या पाश्र्वभूमीवर गेल्या तारखेच्या वेळी, ८ ऑगस्ट रोजी पालिकेचे वृक्ष अधिकारी ढेरे किंवा त्यांचे वकील सुनावणीला हजर नव्हते. सुनावणी सुरू असताना कनिष्ठ श्रेणीचा कर्मचारी हजर झाला. त्याला या प्रकरणाची काहीही माहिती नव्हती. याबाबत न्यायाधिकरणाचे न्यायमूर्ती व्ही. आर. किनगावकर यांनी आक्षेप घेतले.
या वेळी न्यायमूर्ती किनगावकर यांनी, वृक्ष अधिकारी ढेरे यांच्या विरोधात २० हजार रुपयांचे जामीनपात्र अटक वॉरंट काढले. ते पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने बजावायचे आहे. पुढील सुनावणी होण्यापर्यंतच्या काळात झाडे तोडण्यासाठी ढेरे यांच्याकडून कोणतीही परवानगी दिली जाणार नाही, असेही या आदेशात बजावण्यात आले आहे.
पुढच्या सुनावणीला पुणे महापालिकेकडून बेजबाबदार किंवा तृतीय श्रेणीच्या व्यक्तीला नेमले गेले, तर स्वत: महापालिका आयुक्तांना प्रत्यक्ष हजर राहावे लागेल. तसेच, त्यांना दोषी धरले जाईल व दंडित केले जाईल, असेही या आदेशात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2014 रोजी प्रकाशित
उद्यान विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध राष्ट्रीय हरित न्यायालयाचे अटक वॉरंट
पुण्यातील वृक्षतोडीच्या महत्त्वाच्या प्रकरणात सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल पालिकेच्या उद्यान विभागाचे वृक्ष अधिकारी मोहन ढेरे यांच्याविरुद्ध राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने अटक वॉरंट काढले आहे.

First published on: 14-08-2014 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrest warrant against garden dept officer