अभियांत्रिकीची पदवी घेतल्यानंतर अभिषेक मुगळीकर या तरुणाने काही वर्षे एका खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. मात्र, स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असल्याने २०१० मध्ये त्याने प्रोपेलिस कण्ट्रोल सिस्टिम्स प्रा. लि. या फर्मची स्थापना केली. लोखंड, स्टीलच्या उत्पादनांना गेलेले तडे ओळखता येण्यासाठीची उत्पादने, वाहन, तेल उद्योगांच्या कारखान्यांमध्ये कॉम्प्रेस एअरपायपिंग, ऑइल पायपिंग याबाबत उपाययोजना आणि इतर कंपन्यांची उत्पादने आयात करून कन्झ्युमर सिस्टीम तयार करून देण्याचे काम या फर्मकडून केले जाते. वाहन उद्योगक्षेत्राशी संबंधित फर्म असल्याने काम मिळण्यासाठी पिंपरी चिंचवड, चाकण अशा पुण्यातील उद्योगपटय़ांत अभिषेक यांनी अक्षरश: पायपीट केली. त्यानंतर अवघ्या दीड वर्षांत महिंद्रा, टोयोटा, मारूती, ह्य़ुंडाई अशा वाहन उद्योग क्षेत्रातील बडय़ा कंपन्यांच्या कारखान्यांची कामे त्यांना मिळाली. विविध राज्यांत ही उत्पादने पोहोचली आहेत. आखाती देशात उत्पादने निर्यात करण्याचा अभिषेक यांचा मानस आहे.

अभिषेक हे मूळचे हैद्राबादचे. बारावीनंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे गाठले. २००६ मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठातून त्यांनी यांत्रिकी अभियांत्रिकीची पदवी संपादन केली. अभिषेक यांची स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आधीपासूनच होती. मात्र, थेट व्यवसाय सुरू करण्याआधी हायड्रोलिक अ‍ॅण्ड न्यूमेटिक या क्षेत्रातील अनुभव घेण्यासाठी त्यांनी पदवीनंतर चार वर्षे एका खासगी कंपनीमध्ये नोकरी केली. नोकरीच्या चार वर्षांत हायड्रोलिक क्षेत्रातील खाचा-खोचा माहिती झाल्या. तसेच चांगला अनुभव गाठीशी आला. त्यानंतर नोकरी सोडून २०१० मध्ये प्रोपेलिस कण्ट्रोल सिस्टीम्स या फर्मची त्यांनी स्थापना केली. हायड्रोलिक अ‍ॅण्ड न्यूमेटिक क्षेत्रातील अनुभव असल्याने अभिषेक यांनी त्याच क्षेत्रातील यंत्रांच्या कामांना सुरूवात केली आणि अल्पावधीतच पुण्यासह विविध वाहन उद्योग क्षेत्रातील अठरा कारखान्यांच्या ऑटोमेशनची कामे अभिषेक यांना मिळाली.

व्यवसाय सुरू केला तेव्हा वाहन उद्योग क्षेत्र भरभराटीला आले होते. या क्षेत्रात हायड्रोलिक अ‍ॅण्ड न्यूमेटिक उत्पादने वापरली जातात. ऑटोमोटिव्ह कंपन्यांना जलदगतीने त्यांची उत्पादने तयार करावी लागतात. तशी कामे करणाऱ्यांनाच या क्षेत्रातील कामे मिळतात. व्यवसाय सुरू केल्यानंतर अभिषेक पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण अशा पुण्यातील औद्योगिक पट्टय़ामध्ये वाहन उद्योगाशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये स्वत: फिरले. कारखान्यांमध्ये देखभाल दुरूस्तीचे काम, उत्पादनांशी संबंधित विभाग कोण पाहते, कोणती उत्पादने वापरली जातात अशाप्रकारची माहिती त्यांनी घेतली. या सर्व प्रक्रियेनंतर वाहन उद्योगाच्या कारखान्यात कोणकोणती उत्पादने वापरतात, बाजारपेठ यांचा साधारण अंदाज त्यांना आला. तसेच आपसुकच बाजारपेठेचा अभ्यास करण्याची संधी अभिषेक यांना मिळाली. व्यवसायाचा कोणताही अनुभव गाठीशी नसल्याने आपली उत्पादने वापरून पाहण्यासाठी विविध कंपन्यांना साकडे घालावे लागले. अखेर पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी कंपनीने अभिषेक यांची उत्पादने चाचणीसाठी मागवून घेतली. त्यासाठीही अनेक अटी, शर्ती घातल्या. उत्पादनांची चाचणी केल्यानंतर याच कंपनीने त्यांना पहिली मागणी दिली. त्यानंतर फुगेवाडी येथील कारखान्याचे काम अभिषेक यांना मिळाले. चांगले परिणाम दिसून येत असल्याने याच कंपनीच्या पुण्यातील आठ कारखान्यांमध्ये काम करण्याची मागणी आली. अशाप्रकारे महिंद्रा, ह्य़ुंडाई, मारुती, टोयोटा अशा विविध वाहन उद्योग क्षेत्रातील कंपन्यांची कामे त्यांना मिळत गेली.

हैद्राबाद येथे कंपनीची एक शाखा आहे. माझ्याबरोबर श्रीधर वर्तक हे देखील भागीदार आहेत. श्रीधर हे माझे मामा असून ते हैद्राबाद येथून कंपनीचे कामकाज पाहतात. श्रीधर यांना विपणन आणि विक्री या क्षेत्रातील खूप वर्षांचा अनुभव आहे, त्यामुळे ते ही कामे पाहतात. तर, उत्पादन, प्रशासन ही कामे मी स्वत: पाहतो. नऱ्हे येथे कंपनीचा वर्कशॉप आहे. हैद्राबाद येथे केवळ विपणनाचे कार्यालय आहे, असे अभिषेक सांगतात.

वाहन उद्योगामध्ये स्टीलची अनेक उत्पादने वापरली जातात. या स्टीलच्या उत्पादनांना तडा, भेग गेली आहे किंवा कसे? हे तपासण्याचे उत्पादन अभिषेक यांनी तयार केले आहे. ‘संपूर्ण महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील काही भाग, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड अशा विविध राज्यात फर्मची उत्पादने पोहोचली आहेत. कंपनीची उत्पादने महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात पोहोचवायची आहेत. परदेशात फर्मची उत्पादने निर्यात करायची आहेत’, असेही अभिषेक सांगतात.