चिन्मय पाटणकर
‘नैनं छिन्दन्ति शस्त्राणि’ आणि ‘बम्बई’ या दोन वेगळ्या, आशयसंपन्न नाटकांच्या प्रयोगातून इतिहास आणि वर्तमानाचा अनुभव यातून मिळेल.
मगध साम्राज्याची कहाणी
सम्राट अशोकानंतर मगध साम्राज्याचा ऱ्हास आणि शेवट कसा झाला, का झाला या विषयी फारशी चर्चा होत नाही. मगध साम्राज्याची हीच कहाणी नैनं छिन्दन्ति शस्त्राणि या नाटकात मांडण्यात आली आहे. लेखिका मलिका अमर शेख यांच्या कथेवर आधारित या नाटकाचा प्रयोग शनिवारी (१८ मे) रात्री साडेनऊ वाजता भरत नाटय़ मंदिर येथे होणार आहे.
थिएटर फॉर हार्मनी या संस्थेची निर्मिती असलेल्या या नाटकाचं लेखन प्रियंका बगाडे आणि दिग्दर्शन नरेश गुंड यांनी केलं आहे. नाटकात नरेश गुंड, अंकिता नाईक, हर्षल कुलकर्णी, प्रतीक देशपांडे, प्राजक्ता पाटील आदींच्या भूमिका आहेत. अमिता घुगरीनं संगीत, ऋत्विक केळुसकरनं प्रकाशयोजना, निश्चय अटल इंगोलेनं नेपथ्याची आणि भुविनी शहानं रंगभूषेचीची जबाबदारी निभावली आहे. ‘नाटकाची पार्श्वभूमी ऐतिहासिक असली, तरी आजच्या जागतिक घडामोडींशीही ते सुसंगत आहे. जागतिक पातळीवर युद्धापासून मुक्तता मिळवणं शक्य आहे आहे, मूल्य आणि प्रवृत्तींचा संघर्ष संपुष्टात येऊ शकतो का, असे अनेक प्रश्न हे नाटक उपस्थित करतं,’ असं प्रियंका बगाडेनं सांगितलं.
गुन्हेगारी जगतातलं नाटय़
मुंबई.. या एका शहराच्या अनेक ओळखी आहेत. आर्थिक राजधानी, चित्रपटांची मायानगरी ते माफिया जग.. मुंबईच्या माफिया विश्वाचं, विशेषत दाऊद इब्राहिम अनेक ज्ञात-अज्ञात कारनाम्यांचं दर्शन बम्बई या नाटकातून घडवण्यात आलं आहे. या नाटकाचा प्रयोग शुक्रवारी (१७ मे) रात्री साडेनऊ वाजता भरत नाटय़ मंदिर येथे होत आहे.
नाटकाचं लेखन सुमित संघमित्र आणि यश रुईकर यांनी, तर यश रुईकरनं दिग्दर्शन केलं आहे. नाटकात श्रुती कुलकर्णी, सुमित संघमित्र, निषाद भोईर, अनुज प्रभू, वासुदेव मदने, सावनी उपाध्याय, शुभम जिते, सुशांत जंगम, हिमांशू पिले, मंगेश माने, मुग्धा भालेराव, शिवानी राठीवाडेकर आदींच्या भूमिका आहेत. १९९३ नंतर मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतरची कहाणी या नाटकात आहे. एके काळी मुंबईवर राज्य करणारी जेनाबेन आणि हाजी मस्तान यांच्या बोलण्यातून माफिया जगाचे पैलू उलगडत जातात. गुन्हेगारी जगताविषयी आजवर अनेक चित्रपट आलेले असले, तरी वर्तमानाची सांगड घालत नाटकातून गुन्हेगारी जगत उलगडण्याचा हा प्रयोग वेगळा आहे.