असरचा अहवाल प्रसिद्ध
प्रथम फाऊंडेशनने केलेल्या ‘असर’या पाहणीचा अहवाल जाहीर झाला असून राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता काकणभर वाढल्याचे दिसत आहे. शासकीय शाळांच्या तुलनेत खासगी शाळांमध्ये अधिक चांगली गुणवत्ता असल्याचेही या अहवालातून समोर येत आहे. वाचनात राज्यातील विद्यार्थ्यांची थोडी प्रगती दिसत असली तरी गणिताची परिस्थिती मात्र पूर्वी प्रमाणेच आहे.
प्रथम फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील शैक्षणिक परिस्थितीची पाहणी करण्यात येते. विद्यार्थ्यांनी वयानुसार भाषा आणि गणित या विषयांमध्ये ज्या क्षमता आत्मसात करणे आवश्यक आहे, त्या प्रत्यक्षात आत्मसात केल्या जात आहेत का, याची पाहणी करण्यात आली. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी यामध्ये करण्यात आली. दरवर्षी जानेवारीमध्ये प्रसिद्ध होणारा हा अहवाल यावर्षी नव्या शैक्षणिक वर्षांच्या तोंडावर प्रथमने जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील विद्यार्थ्यांची वाचनाची परिस्थिती थोडी सुधारल्याचे दिसत आहे.
मात्र गणितातील प्रगतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत फारसा फरक पडलेला नाही. शासकीय शाळांची गुणवत्ता वाढलेली दिसत असली तरीही अजून खासगी शाळाच पुढे असल्याचेही दिसत आहे. राज्यातील ३३ जिल्ह्य़ांमध्ये ही पाहणी करण्यात आली असून या पाहणीनुसार अमरावती विभाग गुणवत्तेच्या बाबतीत मागे आहे.
शासकीय शाळेतील आठवीत शिकणाऱ्या ७७.७ टक्के विद्यार्थ्यांना दुसरीच्या दर्जाचे वाचन आले, तर खासगी शाळांतील ८०.५ टक्के विद्यार्थी दुसरीच्या दर्जाचे वाचू शकले. आठवीत शिकणारे शासकीय शाळेतील ३१.७ टक्के विद्यार्थी, तर खासगी शाळेतील ३३.३ टक्के विद्यार्थी भागाकाराचे गणित सोडवू शकले. पाचवीतील शासकीय शाळेतील ४६.८ टक्के विद्यार्थी, तर खासगी शाळेतील ५४.४ टक्के विद्यार्थी वजाबाकीचे गणित सोडवू शकले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शासनाचे सर्वेक्षण आणि असरच्या सर्वेक्षणातील फरक स्पष्ट
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) विद्यार्थ्यांच्या क्षमतेची पाहणी केली होती. त्या पाहणीच्या आणि असरमधील तफावतीनंतर प्रथम संस्थेच्या अहवालांबाबत प्रश्न उभे करण्यात आले होते. त्या पाश्र्वभूमीवर या दोन संस्थांच्या पाहणीतील फरक प्रथमने स्पष्ट केला आहे. प्रथमने विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन चाचणी घेतली, तर शासनाने शाळांमध्ये चाचणी घेतली. प्रथमकडून एकच चाचणी वापरून विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासण्यात आल्या, तर शासनाने इयत्तेनुसार चाचण्यांमध्ये फरक केला असे काही फरक प्रथमने नमूद केले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Aser report says educational quality increase in maharastra
First published on: 13-06-2016 at 02:10 IST