इंदापूर : अखंड हरिनामाच्या जयघोषात, टाळ-मृदंगाच्या गजरात सणसरकरांचा निरोप घेऊन सकाळी निघालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीत विसावला.
सकाळची आरती होऊन सणसरकरांचा निरोप घेऊन पालखी सोहळ्याने बेलवाडी येथे प्रस्थान ठेवले. बेलवाडी येथे पालखी सोहळ्याच्या मार्गावरील गोल रिंगण भक्तिमय वातावरणामध्ये झाले. राज्याचे क्रीडा व युवक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी अश्वाचे पूजन केले. या वेळी नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई उपस्थित होते. लासुर्णे, जंक्शन, अंथुरणे गोतंडी असा पल्ला पार करत सायंकाळच्या सुमारास पालखी सोहळा निमगाव केतकीच्या गावकुसावर सवंदडीच्या माळावर आला.
पालखी महामार्गावरील अंथुर्णे या गावचा नेहमीचा मुक्काम या वर्षी रद्द झाल्याने निमगाव केतकीमध्ये पालखी सोहळा येण्यास नेहमीपेक्षा उशीर झाला. तरीसुद्धा भाविक मोठ्या संख्येने पालखी सोहळ्याची वाट पाहत रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. निमगाव केतकीच्या ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. या परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने अन्नदान करण्यात आले. पान उत्पादक शेतकऱ्यांनी विड्यांच्या पानांचे वाटप केले. पालखी मैदानावर पालखी आल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दरम्यान, वाटेत शेळगाव फाटा, गोतंडी येथे ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. ग्रामस्थांनी आणलेल्या पिठले-भाकरीचा वारकऱ्यांनी मनसोक्त आस्वाद घेतला.