लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ पुणे, प्रकाशक संघाची नाशिक शाखा आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे आयोजित चौथ्या लेखक-प्रकाशक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी  मॅजेस्टिक प्रकाशनाचे संचालक अशोक कोठावळे यांची निवड करण्यात आली आहे. ६ आणि ७ मे रोजी नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक येथे हे संमेलन होणार आहे.

अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि प्रकाशक संघाच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष विलास पोतदार यांनी ही माहिती दिली. मॅजेस्टिक प्रकाशनचे संस्थापक दिवंगत केशवराव कोठावळे यांचा प्रकाशन व्यवसायाचा वारसा अशोक कोठावळे यांनी समर्थपणे पुढे नेला आहे. मुंबईबरोबरच पुणे येथे त्यांनी ‘मॅजेस्टिक गप्पा‘द्वारे लेखक आणि वाचक यांचे नाते दृढ केले. दीपावली आणि ललित या दोन्ही अंकांचे संपादक म्हणून १९८३ पासून काम पहात असलेल्या कोठावळे यांना २००४ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ट प्रकाशकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनातर्फे सर्वोत्कृष्ट प्रकाशन संस्थेसाठीचा श्री. पु. भागवत पुरस्काराने मॅजेस्टिकचा गौरव करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.