पुणे : बेदरकारपणे मोटार चालवून पादचारी महिलेला धडक दिल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस फौजदाराला पोलीस दलातून निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला.

याप्रकरणी सहायक फाैजदाराविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्ञानेश्वर दिनकर माडीवाले असे निलंबित करण्यात आलेल्या सहायक फौजदाराचे नाव आहे. माडीवाले हे चतुःशृंगी पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. ते २ जून रोजी मोटारीतून एनडीए रस्त्यावरील कोंढवे धावडे परिसरातून निघाले होते. त्या वेळी धावडे पेट्रोल पंपासमोरील रस्त्यावर एका पादचारी महिलेला त्यांच्या मोटारीने धडक दिली. अपघातात पादचारी महिला गंभीर जखमी झाली. जखमी झालेल्या महिलेवर खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

वेगाने मोटार चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी माडीवाले यांच्याविरुद्ध उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. माडीवाले यांची विभागीय चौकशी करण्यात आली. त्यानंतर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचा आदेश दिला. माडीवाले यांच्या वर्तनामुळे पोलीस नियमावलीचा भंग झाला, तसेच पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मद्यप्राशन केल्याचे उघड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माडीवाले यांनी दारूच्या नशेत मोटार चालविल्यामुळे अपघात झाला. या घटनेत पादचारी महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ)(ब), २८१ आणि मोटार वाहन अधिनियम कलम ११९, १७७, १८४, १८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.