कवायत मैदान ते ‘रॅम्प वॉक’
पुणे : पोलीसांविषयी समाजात विशिष्ट प्रतिमा असते. साहित्य, कलेविषयी पोलिसांना फारशी जाण नसते, असा अनेकांचा समज असतो. पण या समजाला छेद देणारे अनेकजण पोलीस दलात कार्यरत असतात. पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा पाटील यांनी नुकतीच सौंदर्य स्पर्धेत छाप पाडली आणि सौंदर्य, बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यांनी ‘रिनिंग मिसेस इंडिया’ हा किताब पटकावला.
बाणेर येथील एका तारांकित हॉटेलममध्ये ही स्पर्धा पार पाडली. या स्पर्धेत विशेष शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमा विघ्नेश पाटील विजेत्या ठरल्या. पोलीस दलातील सेवा तसेच सौंदर्य स्पर्धेतील सहभागाविषयी बोलताना त्या म्हणाल्या, मी मूळची कराडची. आमच्या घरातील कोणीच पोलीस सेवेत नव्हते. शिवाजी विद्यापीठातून मी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. २००७ पासून मी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर २००९ मध्ये मी पोलीस सेवेत दाखल झाले. माझे पती संगणक अभियंता असून मला दोन वर्षांचा मुलगा आहे. दोन महिन्यांपूर्वी समाजमाध्यमावर विवाहित महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या सौंदर्यस्पर्धेबाबतची माहिती मिळाली.अगदी सहज म्हणून मी या स्पर्धेत सहभाग नोंदविला.
सौंदर्य स्पर्धेत केवळ चांगले दिसणे हा निकष पाहिला जात नाही. अवांतर वाचन करावे लागते. पोलीस दलात असल्यामुळे मला समाजातील इतर घडामोडींची माहिती होते. किंबहुना कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे मानसिक बळ पोलीस सेवेमुळे मिळते. त्याचा फायदा निश्चितच झाला. पोलीस कवायत मैदानावरील कवायतीचा सराव असला तरी सौंदर्यस्पर्धेतील रॅम्प वॉकचा अनुभव नव्हता. विवाहित महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धाच्या ध्वनिचित्रफिती मी समाजमाध्यमावर पाहिल्या. त्यानंतर या स्पर्धेबाबतची सखोल माहिती समजली, असे पाटील यांनी नमूद केले.