स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमध्ये रोख रक्कम भरण्यासाठी घेऊन जात असलेली व्हॅन पळवून नेणाऱ्या चालकासह तिघांना गोव्यात लोणीकंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपये जप्त करण्यात आले असून पोलिसांचे पथक त्यांना पुण्याकडे घेऊन निघाले आहे.
प्रमोद उर्फ बाळू बबन इंगळे (वय २९, रा, वारजे माळवाडी) व त्याचा मित्र कदम अशी तिघांपैकी दोघांची नावे आहेत. २० जुलै रोजी सायंकाळी वाघोली येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी सायन्टिफीक सिक्युरीटी कॅश मॅनेजमेन्ट सव्र्हिस कंपनीचे कर्मचारी गेले. त्यांच्या मोटारीत दोन कोटी ३२ लाख रुपये होते. त्यातील एक कोटी घेऊन एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी दोन कर्मचारी उतरले. इंगळे याने व्हॅन पुढे घेतो म्हणून एक कोटी सोळा लाख रुपये घेतले व पळून गेला. काही अंतरावर त्याचा मित्र कदम हा दुसरी मोटार घेऊन उभा होता. एक कोटी सोळा लाख रुपयांची पेटी घेऊन ते पळून गेले होते. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांची पथके त्यांच्या मागावर होती. अखेर त्यांना गोव्यात ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एक कोटी दहा लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक एन. एस. न्याहाळदे यांनी दिली.