प्राथमिक तपासात खडसेंवरील आरोपांमध्ये तथ्य नाही
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळून आले नाही. मात्र या प्रकरणात अन्य बाजू पडताळण्यासाठी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) चौकशी करण्यात येत आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या घरातून एकनाथ खडसे यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्यात आल्याचे आरोप खडसे यांच्यावर करण्यात आले होते. गृह राज्यमंत्री शिंदे हे एका कार्यक्रमानिमित्त रविवारी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांची भेट घेतली. खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत काही प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केले. पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, खडसे यांना जाणीवपूर्वक बदनाम केले जात आहे. त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांच्या अनुषंगाने चौकशीदेखील करण्यात आली. परंतु या चौकशीत काही आढळून आले नाही. खडसे यांनी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दाखविली आहे. या प्रकरणाच्या अन्य बाजू पडताळण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे या प्रकरणाची चौकशी सोपविण्यात आली आहे.
पुणे शहरात पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला आणि सहआयुक्त सुनील रामानंद यांनी अवैध धंद्यांवर कारवाई केल्याने शहरातील अवैध धंदे करणारे पुणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत जाऊन त्यांचे व्यवसाय करत असल्याचे पत्रकारांनी शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याअनुषंगाने शिंदे म्हणाले की, अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या पोलीस निरीक्षकाला जबाबदार धरण्यात येईल. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंदे आढळून येतील, अशा पोलीस ठाण्यांच्या पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात येईल.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2016 रोजी प्रकाशित
खडसे प्रकरणातील काही बाजू पडताळण्यासाठी एटीएसकडून चौकशी
महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत प्राथमिक चौकशीत काही तथ्य आढळून आले नाही.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 30-05-2016 at 03:04 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ats to probe to verify few side of khadse case