लोकसत्ता वार्ताहर

इंदापूर : इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर शुक्रवारी अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यातून श्रीकांत पाटील बचावले. मात्र, या घटनेमुळे तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळी अकराच्या सुमारास श्रीकांत पाटील हे आपल्या शासकीय वाहनातून तहसील कार्यालयाकडे जात होते. त्यांची जीप संविधान चौकातून पुढे जात असतानाच दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी चालकाच्या बाजूने लोखंडी गजाने काचा फोडल्या. त्यानंतर जीपच्या सर्व काचा फोडल्या. चालकाच्या, तसेच श्रीकांत पाटील यांच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकण्याचा प्रयत्न केला. चार ते पाच हल्लेखोर वाहन क्रमांक नसलेल्या मोटारीतून आले असल्याची माहिती आहे. आजूबाजूच्या लोकांना काही समजण्याच्या आतच हल्लेखोर तेथून पळून गेले. हल्ला झालेले ठिकाण हे तहसील कार्यालय आणि इंदापूर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर आहे.

आणखी वाचा-पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी मोठी कारवाई; येरवडा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी निलंबित

जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या श्रीकांत पाटील यांच्याकडे एक कर्तव्यदक्ष तहसीलदार म्हणून पाहिले जाते. कळाशी येथील बोट दुर्घटनेत उजनी जलाशयात बुडालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक आले होते. या पथकाच्या बोटीमध्ये बसून पाटील बुडालेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत होते. अशा अधिकाऱ्यावर आज हा जीवघेणा हल्ला झाल्याने तालुकावासीयांकडून हळहळ व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाळूवर अनेकांचा डोळा असून, रात्री वाळूची तस्करी करण्याचा वाळूमाफियांचा नेहमीच प्रयत्न होत असतो. मात्र, पाटील यांनी आपल्या कामातून वाळू माफियांवर जरब बसवून वाळूची तस्करी रोखण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. अशा तहसीलदारावर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेत तहसीलदारांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

आणखी वाचा-पिंपरी: क्रिकेट खेळताना तरुणाला हृदविकाराचा झटका; ‘तो’ क्रिकेट चा सामना ठरला शेवटचा!

या हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आमदार दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. दरम्यान, हा हल्ला होताच इंदापूर पोलिसांनी तातडीने इंदापूर शहर आणि परिसराची नाकाबंदी केली असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी कसून प्रयत्न होत आहेत. लवकरच आम्ही गुन्हेगारांचा माग काढून त्यांना अटक करू, असा विश्वास इंदापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सूर्यकांत कोकणे यांनी व्यक्त केला.

पुण्यातील धनिकपुत्राने केलेल्या अपघातानंतर झालेल्या या हल्ल्याचा निषेध व्यक्त करीत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर ताशेरे ओढले. ‘आता तरी राज्यातील कायदा आणि व्यवस्था नीट सांभाळा’ अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून केली.