पिंपरी- चिंचवड: पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात १६ वर्षीय बालकाचाही समावेश आहे. त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिले आहे.
पिंपरी कॅम्पमध्ये अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाचा नागरिक हिंदू धर्मातील नागरिकांचं धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. नागरिकांच्या घराबाहेर जाऊन त्यांना आवाज देऊन इतर धर्माविषयी माहिती दिली जात होती. ‘तो’ किती श्रेष्ठ आहे, हे सांगितलं जातं होतं. ‘तो’ धर्म वगळता कुठलाच धर्म महत्वाचा नाही. इतर धर्म केवळ कथा आहेत. धर्मपरिवर्तन केल्यास तुम्हाला सुख, समृद्धी, आरोग्य लाभेल, असं नागरिकांना पटवून दिले जात होतं. पैशांचेदेखील अमिष दाखवलं जात होतं.
अखेर याप्रकरणी काही सजग नागरिकांनी थेट पिंपरी पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकार सांगितला. पिंपरी पोलिसांनी तात्काळ अमेरिकन नागरिक आणि एका भारतीय नागरिकाला अटक केली. अमेरिकन नागरिक हा एक वर्षाच्या मुदतीवर भारतात आलेला आहे.
“रविवारी हा सर्व प्रकार उजेडात आला आहे. काही नागरिक पिंपरी कॅम्पमध्ये धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करत होते. तेथील नागरिकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार केली होती. त्यानुसार कारवाई करत अमेरिकन आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली आहे.” – अशोक कडलग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक