विदेशातून परतलेल्या नागरिकांवर लक्ष

कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापुरात विलगीकरणाचे आदेश

(संग्रहित छायाचित्र)

पुणे विभागातील पुणे शहर व जिल्हा वगळता सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चार जिल्ह्य़ांमधील गेल्या एक महिन्यात परदेशात जाऊन परतलेल्या नागरिकांवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. या नागरिकांना आपापल्या घरामध्येच विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले असून कुटुंबीयांच्या जास्त संपर्कात न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शुक्रवारी पुण्यात दिली.

करोनाबाबत विभागीय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ. म्हैसेकर यांनी संवाद साधला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, गेल्या एक महिन्यात कोल्हापुरात ४४, सांगलीत सहा, साताऱ्यात नऊ आणि सोलापुरात सात नागरिक परदेशातून परतले आहेत. या नागरिकांना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. करोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून या सर्व नागरिकांना त्यांच्याच घरात पंधरा दिवस विलगीकरण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या काळात आपापल्या कुटुंबीयांशी देखील फार संपर्कात न येण्याबाबत सूचना दिल्या आहेत. विलगीकरणादरम्यान काय काळजी घ्यायची, त्याबाबत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

या चारही जिल्ह्य़ांतील जिल्हाधिकारी यांना विलगीकरण कक्ष, स्वतंत्र कक्ष (क्वारेंटाइल फॅसिलिटी) तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या चारही जिल्ह्य़ांमध्ये अद्याप एकही करोनाबाधित रुग्ण आढळून आलेला नसल्याने परिस्थिती काळजी करण्यासारखी नाही. मात्र, प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनाकडून सुरू करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांसाठी आवश्यक साहित्याची खरेदी करण्याचे पूर्ण अधिकार जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाकडून देण्यात आले आहेत, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.

याशिवाय या चारही जिल्ह्य़ांतील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी होऊ नये, म्हणून व्यापक जनजागृती करावी, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या सात देशांमधून प्रवास करून आलेल्या व्यक्तींना तपासून स्वतंत्र कक्षात न्यावे, सहली आयोजित करणाऱ्या मध्यस्थांकडून परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी घेऊन उपाययोजना करावी, परदेशातून परतणाऱ्या पर्यटकांनी स्वत:हून घरीच पंधरा दिवस स्वतंत्र राहावे, अशा सूचना द्या, असे निर्देशही डॉ. म्हैसेकर यांनी सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या चारही जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

साताऱ्यातील ‘त्या’ व्यक्तीवर कारवाई

साताऱ्यात एक करोनाबाधित रुग्ण असल्याची माहिती समाजमाध्यमांवर पसरवण्यात आली. मात्र, ही माहिती खोटी असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ही खोटी माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकाचा शोध पोलिसांनी लावला असून संबंधित व्यक्तीने गेल्या दोन दिवसांपासून मोबाइल बंद करून ठेवला आहे. ही व्यक्ती शोधून तिच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Attention on returning citizens from abroad abn