दोन वर्षांपूर्वी हडपसरमध्ये झालेल्या दोन टोळ्यांमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामीन मिळवून बाहेर आलेल्या गुंडावर चौघांनी कोयत्याने वार करुन त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पसार झालेल्या चौघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.
ओम उर्फ पिंटू विनोद भंडारी (वय २१) , राजन रघुनाथ लावंड (वय २१), ऋषीकेश प्रवीण शितोळे (वय १९), रोशन हनुमंत सोनकांबळे (वय २१, चौघे रा. माळवाडी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. शुभम भोंडे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत प्रदीप दिनकर देवकर (वय २२, रा. साडेसतरानळी, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुभम भोंडेने २०२० मध्ये वर्चस्वाच्या वादातून एकाचा खून केला होता. या गुन्ह्यात तो जामीन मिळवून कारागृहातून बाहेर आला आहे. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दीडच्या सुमारास प्रदीप देवकर आणि शुभम वेैभव चित्रपटगृहापासून रिक्षाने निघाले हाेते. त्या वेळी आरोपी सागर घायतडक, ओम भंडारी, राजन लावंड, ऋषीकेश शितोळे, रोशन सोनकांबळे दुचाकीवरुन आले.
तू अनिकेत घायतडक याचा खून केला आहे. खुनाचा बदला आम्ही घेणार आहोत. पाच लाख रुपये दे. नाहीतर तुला जीवे मारु, अशी धमकी देऊन आरोपींनी शुभमवर कोयत्याने हल्ला केला. आरोपी तेथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. पसार झालेल्या चौघा आरोपींना गुन्हा घडल्यानंतर चार तासात अटक करण्यात आली.
पोलीस उपायु्क्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिगंबर शिंदे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे, समीर पांडुळे, शाहीद शेख, निखील पवार आदींनी ही कारवाई केली.