‘गेल्या कित्येक वर्षापासून पक्षातील तेच नेते भाषण आणि दौरे करताना दिसत आहेत. अशा नेत्यांना ऐकून नागरिक थकले आहेत. त्यामुळे अशा नेत्याना बाजूला ठेवण्याची गरज असून नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची गरज आहे. तसेच पक्षातील घराणेशाहीला बाजूला ठेवा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ज्यांनी गद्दारी केली अशांना खड्डयासारखे बाजूला करा,’ अशी मागणी काही कार्यकर्त्यांनी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. त्यावेळी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्त्यांच्या प्रश्नांना अमोल कोल्हे यांनी दिलखुलासपणे उत्तरेदेखील दिली.

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने खासदार अमोल कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली ‘युवा संवाद’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पार्थ पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. तर या कार्यक्रमादरम्यान प्रवक्ते अंकुश काकडे यांनी कार्यकर्त्यांना प्रतिज्ञादेखील दिली. या युवा संवादाच्या कार्यक्रमामुळे खुलेपणाने पक्षातील अंतर्गत वाद आणि गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पहावयास मिळाले.

आता येत्या काही दिवसांमध्ये राज्याच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यातच अनेक पक्षांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या तर शिवसेनेतर्फे सुरू असलेल्या जनआशीर्वाद यात्रेच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेने उत्तर देण्यात येणार आहे. खासरदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली असून खासदार उदनराजे भोसले हेदेखील या यात्रेत सहभागी होणार आहेत.