पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी महत्त्वाचे धरण असलेल्या टेमघर धरणाच्या दुरुस्तीला सुधारित प्रशासकीय मान्यतेची (सुप्रमा) प्रमुख अडचण आहे. त्यामुळे या प्रकल्पाला सुप्रमा मिळाल्यास येत्या जूनपर्यंत अल्पमुदतीमधील कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रमा मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
टेमघर धरण मुठा नदीवर मुळशी तालुक्यातील मौजे लव्हार्डे येथे बांधण्यात आले आहे. या धरणाचे बांधकाम २००० साली सुरू करून २०१०-११ पासून पूर्ण क्षमतेने पाणीसाठा करण्यात येत आहे. धरणाची क्षमता ३.७१ अब्ज घनफूट (टीएमसी) आहे. हे धरण पुणे शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी आणि मुळशी तालुक्यातील एक हजार हेक्टर सिंचनासाठी प्रस्तावित आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चार धरणांपैकी टेमघर धरण हे महत्त्वाचे धरण आहे. या धरणातून होणाऱ्या पाण्याची गळती रोखण्याचे काम सुरू आहे. सन २०१७ पासून गळती प्रतिबंधक कामांना सुरुवात झाली असून धरणाची ९० टक्के गळती रोखण्यात जलसंपदा विभागाला यश मिळाले आहे.
यंदा पावसाळ्यात हे धरण दोन वेळा भरून वाहिले होते. तसेच या भागात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाची गळती प्रतिबंधक कामे सुरू करता आली नव्हती. मात्र, पाऊस थांबल्यानंतर खडकवासला धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने टेमघर धरणातील पाणी खडकवासला धरणात सोडण्यात सुरुवात झाली आहे. सध्या या धरणात ०.४९ टीएमसी (१३.११ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.
दरम्यान, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत टेमघर धरणाचा विषय आल्यानंतर खासदार गिरीश बापट आणि उपमुख्यमंत्री पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना धरणाच्या दुरुस्तीच्या कामात काही अडचणी आहेत किंवा कसे, असे विचारल्यानंतर उर्वरित दुरुस्तीच्या कामासाठी प्रकल्पाला सुप्रमा मिळणे आवश्यक आहे. तसे झाल्यास अल्प कालावधीतील दुरुस्तीची कामे येत्या जूनपर्यंत पूर्ण होतील. मात्र, दीर्घकालीन उपाययोजना होत नाहीत, तोवर धरण पूर्ण क्षमतेने भरता येणार नाही, असा अभिप्राय केंद्रीय जल व ऊर्जा संशोधन संस्थेच्या (सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च स्टेशन – सीडब्लूपीआरएस) तज्ज्ञ समितीने दिला असल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यावर सुप्रमा मिळवून देण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.
‘सुप्रमा’ म्हणजे काय?
शासनाने एखादे काम हाती घेण्यासाठी दिलेली प्रशासकीय सुधारित मान्यता म्हणजे सुप्रमा. या मान्यतेमध्ये प्रामुख्याने नव्याने किती खर्च करावा लागणार याचा उल्लेख असतो. टेमघर धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची किंमत वाढल्यामुळे या प्रकल्पासाठी सुप्रमा आवश्यक आहे. मंजूर झालेली मागील सुप्रमा साधारण दहा वर्षांपूर्वी मिळाली होती. मात्र, भाववाढ आणि इतर कारणांनी प्रकल्पाची किंमत वाढली असून गेल्या सुप्रमामध्ये धरणाच्या दुरुस्तीच्या कामाची तरतूद नव्हती. परिणामी, या धरणाच्या उर्वरित दुरुस्तीच्या कामासाठी सुप्रमा आवश्यक आहे.