पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्न विद्यापीठ यांच्यातर्फे राबवला जाणारा विज्ञान मिश्रशाखा अभ्यासक्रम (बीएस्सी. ब्लेंडेड) आता चार वर्षांचा करण्यात आला आहे. २०१८पासून राबवण्यात येणारा हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा होता. मात्र राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तो चार वर्षांचा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, विद्यार्थ्यांना दोन वर्षे मेलबर्न विद्यापीठात शिकता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचा तपशील लवकरच जाहीर केला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाच्या व्यापार आणि पयर्टन मंत्री डॉन फरेल यांच्या उपस्थितीत चार वर्षांच्या अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे, ‘विद्यापीठाच्या इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्सेस’ प्रमुख डॉ. अविनाश कुंभार, मेलबर्न विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डंकन मास्केल या वेळी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह मद्रास विद्यापीठ, गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट येथेही हा अभ्यासक्रम यंदापासून राबवला जाईल.

हेही वाचा >>> पुणे : प्रलंबित मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिका, सेविकांचे आक्रोश आंदोलन

भारतीय विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाचा मार्ग खुला करून देण्यासाठी ही संधी उपलब्ध करण्यात आली आहे. भारतातील प्रतिष्ठित विद्यापीठांसोबत एकत्र काम करता येत असल्याचा आनंद असल्याचे डॉ. डंकन मास्केल यांनी सांगितले. विद्यापीठाने सुरू केलेला हा चार वर्षाचा पदवी अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुसरून आहे. त्यामुळे मेलबर्नसारख्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठातही विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर पदवी, तसेच संशोधनाची संधी मिळेल. व्हिसा योजनेअंतर्गत ऑस्ट्रेलियामध्ये रोजगाराच्या संधीही मिळू शकतील. तसेच भारतातील प्राध्यापकांना या विद्यापीठासोबत संशोधन आणि तंत्रज्ञान आदींचे आदानप्रदान करणे शक्य होईल, असे डॉ. कारभारी काळे यांनी सांगितले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरणशास्त्र, भूशास्त्र या विषयात तीन वर्षाची पदवी घेता येते. याच विषयात चार वर्षाची पदवी घेता येईल. याबाबतची अधिक माहिती लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल असे डॉ. अविनाश कुंभार यांनी सांगितले.