पुणे : जगभरात हजारो कोटी रुपयांची उत्पादने निर्यात करणारे बाबा कल्याणी हे खऱ्या अर्थाने आर्थिक राष्ट्रवादाचे प्रतीक आहेत, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी बाबा कल्याणी यांचा शनिवारी गौरव केला. भारताला आत्मनिर्भर करण्यासाठी सकल राष्ट्रीय उत्पादनातील (जीडीपी) उत्पादन क्षेत्राचा वाटा किमान दुप्पट करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी किमान शंभर बाबा कल्याणी निर्माण झाले पाहिजेत, असेही गडकरी म्हणाले.  पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे गडकरी यांच्या हस्ते ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी गडकरी बोलत होते.

माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार गिरीश बापट, श्रीनिवास पाटील, पुण्यभूषण निवड समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. शां. ब. मुजुमदार, चंदू बोर्डे, प्रतापराव पवार, फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई आणि गजेंद्र पवार उपस्थित होते. देशाच्या रक्षणासाठी अपंगत्व पत्करलेल्या पाच सैनिकांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

गडकरी म्हणाले, बाबा कल्याणी यांचा गौरव हा आत्मनिर्भर भारताच्या नेतृत्वाचा सत्कार आहे. आत्मनिर्भर भारत साकारण्यासाठी आयात कमी करून निर्यात वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी देशातील युवकांना उद्योजकता आणि उद्यमशीलतेचे शिक्षण देण्याची गरज असून बाबा कल्याणी हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. शिक्षणाचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र ही जशी पुण्याची ओळख आहे त्याचप्रमाणे येत्या काळात पुणे हे उत्पादनाचे केंद्र म्हणून जगाच्या नकाशावर ठळक स्थान पटकावेल. मात्र, हे करताना पुण्याच्या पर्यावरणाचे नुकसान होणार नाही आणि वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घ्यावी लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत फोर्जमध्ये मी कामाला सुरुवात केली त्याला ५० वर्षे होत असतानाच पुण्यभूषण पुरस्कार मिळणे भाग्याचे आहे, अशी भावना कल्याणी यांनी व्यक्त केली. उदारीकरणानंतर आम्हाला विस्तार करण्याची आणि जागतिक पातळीवर झळकण्याची संधी मिळाली. आता भारत फोर्ज फोर्जिगमधील जगातील पहिल्या क्रमांकाची कंपनी झाली आहे, असे कल्याणी यांनी सांगितले. कल्याणी म्हणाले,  आयात कमी, निर्यात अधिक म्हणजे आत्मनिर्भर भारत. एखादे उत्पादन आपण आयात करतो याचा अर्थ आपण त्यासाठीची गुणवत्ता, क्षमताही निर्माण करू शकत नाही. गुणवत्ता आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून भारताची वेगाने प्रगती झाली. करोनाची दोन वर्षे आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे त्याला खीळ बसत आहे. देशाच्या शताब्दी वर्षांत भारत आपल्या तंत्रज्ञानावर जगात दुसऱ्या क्रमांकावर असेल. जावडेकर, बापट, डॉ. माशेलकर, पवार, पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. देसाई यांनी प्रास्ताविक केले. योगेश देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. काका धर्मावत यांनी आभार मानले.