अधिकाऱ्यांची संस्थेच्या आवारातच मद्यपार्टी

पन्नास वर्षांच्या आपल्या चांगल्या कामाचे दाखले देत सुवर्णमहोत्सव साजरा करणाऱ्या बालभारतीच्या या महोत्सवी वर्षांची सांगता मात्र वादग्रस्त झाली आहे. संस्थेच्या आवारातच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या दारूपाटर्य़ा  रंगत असल्याची बाब समोर आली असून यामध्ये सहभागी असणाऱ्या एका अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी सांगितले.

बालभारतीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांची सांगता शुक्रवारी झाली. या समारंभात संस्थेचा भूषणावह प्रवास सांगण्याऐवजी संस्थेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची अप्रत्यक्षपणे कानउघाडणी करण्याची वेळ संस्थेच्या संचालकांवर आली. सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त संस्थेची इमारत रोषणाईने सजलेली असताना आत मात्र दारूपार्टी रंगली होती. संस्थेच्या सांगता समारंभापूर्वी दोन दिवस आधी संस्थेच्या आवारात अधिकारी आणि कर्मचारी दारू पिऊन पडले होते. सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभातही याच गोष्टीची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये रंगली होती.

या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून एका अधीक्षक पदावरील अधिकाऱ्याचे नाव समोर येत आहे. या प्रकारात कोण अधिकारी व कर्मचारी यात सहभागी होते त्याची चौकशी सुरू असून ज्या अधिकाऱ्याचे नाव समोर आले आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रक्रियेनुसार या अधिकाऱ्याची विभागीय चौकशी सुरू करण्यात येईल. त्याचप्रमाणे बालभारतीच्या आवारात सगळीकडे सीसीटीव्ही लावण्यात येतील,’ अशी माहिती डॉ. मगर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. बालभारतीतील विश्रामगृहात सर्रास दारूपाटर्य़ा होत असतात. सुरक्षारक्षक आणि काही कर्मचारी अधिकाऱ्यांना दारू आणून या पाटय़ार्ंची व्यवस्था करतात अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांकडून देण्यात येत आहे.