पिंपरी : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांसाठी बालनगरी स्वतंत्रपणे उभारण्यात आली आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी नाट्य संमेलनात लहान मुलांसाठी भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये शतक महोत्सवी मराठी नाट्य संमेलन शनिवारी आणि रविवारी होणार आहे. चिंचवड येथील श्री मोरया गोसावी संकुल येथे नाट्य संमेलनाचा मुख्य सभामंडप असणार आहे. तर, बालनाट्यनगरी भोईरनगर येथे आहे. शहरातील चार नाट्यगृहांमध्ये वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम व नाटकांची मेजवानी रसिक प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले, की आजपर्यंत ९९ नाट्य संमेलने झाली. त्यांमध्ये लहान मुलांसाठी एखाद-दुसरे नाटक किंवा बालगीतांचा कार्यक्रम व्हायचा. त्यामुळे नाट्य संमेलनात लहान मुलांचा सहभाग कमी प्रमाणात दिसायचा. परंतु, शंभरावे संमेलन घेताना आम्ही जाणीवपूर्वक लहान मुलांसाठी ‘बालनगरी’ हा एक वेगळा रंगमंच ठेवला आहे. मुलांना बालपणापासूनच नाटकाची गोडी लागावी, त्यांच्यावर नाटकाचे संस्कार व्हावेत, हा यामागील उद्देश आहे. स्थानिक बालकलाकारांच्या विविध कार्यक्रमांबरोबरच ‘बोक्या सातबंडे’ हे व्यावसायिक बालनाट्य, ग्रीप्स थिएटरचे गोष्ट सिंपल पिल्लाची, बालगीते, पपेट शो हे मुलांसाठी आकर्षण असणार आहेत.

हे कार्यक्रम पाहण्यासाठी महापालिका शाळा, झोपडपट्टी भागात असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना निमंत्रित केले आहे. लहान मुले यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आनंद लुटतील, असा विश्वास भोईर यांनी व्यक्त केला.

दरम्यान, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता सर्व नाट्यगृहांचे रंगभूमी पूजन, सायंकाळी पाच वाजता बालनगरीचे उद्घाटन, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अस्तित्व हे नाटक भरत जाधव आणि सहकारी रात्री नऊ वाजता सादर करणार आहेत.

नाट्यगृहे सजली

पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे आणि निगडी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहांमध्ये संमेलनाचे कार्यक्रम होणार आहेत. नाट्यगृह आकर्षक रोषणाईने सजली आहेत. नाट्यगृहांचा परिसर उजळून निघाला आहे.