दत्ता जाधव

पुणे : केळय़ांसाठी जगप्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्ह्यात काढणीयोग्य केळीचे प्रमाण कमी झाले आहे. तर उत्तर भारतातील श्रावण महिना १४ जुलैपासून सुरू झाला आहे. तिथे श्रावणात होणाऱ्या जत्रा-यात्रांमुळे केळय़ांची मागणी वाढली आहे. अरब देशांत होणारी केळीची निर्यातही सुरळीत आहे. परिणामी त्यांचे दर तेजीत आहेत. सध्या दर्जानुसार ४० ते ५० प्रति डझन दराने केळी मिळत आहेत. महाराष्ट्रातील श्रावण महिना सुरू झाल्यानंतर त्यात सरासरी पाच रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेसह विविध कारणांमुळे यंदा केळीच्या लागवडीवर परिणाम झाला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली.

केळी पक्व होण्याचा काळ वाढला?

रावेत तालुक्यातील विवरे गावातील प्रगतिशील शेतकरी देवेंद्र राणे म्हणाले की, यंदा केळी पक्व होण्याचा काळ एका महिन्याने वाढला आहे. यापूर्वी असे कधीच झाले नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असणाऱ्या वेळेत बाजारात केळी येत नाहीत. त्याचा मोठा परिणाम बाजारातील उपलब्धतेवर झाला आहे. मुंबई-पुण्यातील ग्राहकांना दर्जानुसार ४० ते ५५ रुपये प्रति डझन दराने केळी मिळत आहेत. श्रावण महिन्यात आणखी पाच रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.  केळय़ांच्या पक्व होण्याच्या काळात सरासरी पंधरा दिवसांनी वाढ झाली आहे, अशी माहिती केळी संशोधन केंद्राचे निवृत्त प्राध्यापक सी. डी. बडगुजर यांनी दिली.