सायकल चोरीला गेल्याने चिडलेल्या अल्पवयीन मुलाने पेटवल्या दुचाकी

भाटनगर पत्रा शेड येथे पार्किंगला लावलेल्या पाच दुचाकी गाड्या पेट्रोल टाकून अल्पवयीन मुलाने पेटवून दिल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली.

पिंपरीत अल्पवयीन मुलाने दुचाक्या जाळल्या.

पिंपरीच्या लिंक रोडवरील भाटनगर पत्राशेड येथे एका अल्पवयीन मुलाने पाच दुचाकी पेटवून दिल्याची घटना पहाटे साडेतीन वाजता घडली आहे. यात पाच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सायकल चोरीला गेल्याने चिडलेल्या मुलाने हे गुन्हेगारी कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाटनगर पत्रा शेड येथे पार्किंगला लावलेल्या पाच दुचाकी गाड्या पेट्रोल टाकून अल्पवयीन मुलाने पेटवून दिल्याची घटना मंगळवारी पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली. आगीची वर्दी अग्निशमन दलाला दिल्यानंतर जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव गेत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत पाच दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. तसेच घराच्या शेजारी आग लागल्याने घराला देखील याची झळ पोहचली आहे.

दरम्यान, याप्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत. अल्पवयीन मुलाची सायकल चोरीला गेली होती. तो भाटनगर येथेच राहतो याच रागातून त्याने पाच दुचाकी पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Because of bicycle stolen a minor boy fired 5 bikes