पुणे : शासनाच्या मद्य विक्रीवरील धोरणांमुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला असून, त्याविरोधात राज्याच्या परवाना कक्षेतील ‘बार आणि लाउंज बार’ सोमवारी (१४ जुलै) एकादिवसाठी बंद ठेऊन आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. संघटनेचे उपाध्यक्ष जवाहर चोरगे, विश्वनाथ पुजारी, सचिव राजेश शेट्टी, खजिनदार मोहन शेट्टी या वेळी उपस्थितीत होते.
राज्य शासनाने मद्य विक्रीवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) ५ टक्क्यांवरून १० टक्के, परवाना शुल्कात १५ टक्के वाढ आणि भारतीय बनावटीच्या परदेशी मद्यावर (आयएमएफएल) उत्पादन शुल्कात ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. ‘राज्याच्या परवाना क्षेत्रातील १९ हजार, तर पुण्यात ४ हजार २०० बार आहेत. सरकारच्या या धोरणांमुळे राज्यातील हॉटेल व्यवसाय बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे,’ असे शेट्टी यांनी सांगितले.
‘प्रीमियम ब्रँड्स महाग झाल्यामुळे ग्राहक कमी गुणवत्तेच्या मद्याकडे वळतील आणि त्यांच्या जिवासह सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होईल. ग्राहकांची उपस्थिती कमी झाल्यास बार, रेस्टॉरंट्स, पर्यटन क्षेत्राचे उत्पन्न कमी होईल, त्याने राज्याच्या तिजोरीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गोवा, मध्य प्रदेशसारख्या सीमावर्ती राज्यांतून अवैध मद्याचा वापर वाढण्याचा धोका या धोरणांमुळे निर्माण झाला आहे,’ अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.
आमचा व्यवसाय अत्यंत संकटात आहे. या व्यवसायावर अवलंबून असणारे व्यवसायिक, हजारो कुंटुंबे, कामगार उद्धवस्त होण्याच्या उंबरठ्यावर येतील. त्यामुळे सरकारने या धोरणांचा पुर्नविचार करावा. दारूवरील ‘व्हॅट’ रद्द करावा. एकदम मोठ्या दरवाढीऐवजी उद्योग व्यवसायिकांना विश्वासात घेऊन आर्थिक धोरणे ठरवावित. – गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे</strong> रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशन