पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानापूर्वी नांदेड येथील भारत रामिनवार आणि मीरा रामिनवार यांनी मंगळवारी आळंदी येथे माउलींना एक कोटी रुपये किमतीचा एक किलो सोन्यापासून बनविलेला मुकुट अर्पण केला.पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. यांनी चार महिन्यांच्या अथक परिश्रमातून हा मुकुट साकारला आहे. पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची सूक्ष्म कोरीव रचना आणि आधुनिक थ्रीडी तंत्रज्ञानाचा समन्वय या मुुकुटाच्या घडणीमध्ये पाहायला मिळतो.
मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण या धार्मिक प्रतीकांची कलात्मक मांडणी करण्यात आली आहे. वारकरी परंपरेशी नाते असलेल्या कारागिरांनी हा मुकुट घडवला आहे. आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, ॲड. राजेंद्र उमाप आणि व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या उपस्थितीत माउलींना हा अलंकार भक्तिपूर्वक अर्पण करण्यात आला.