पुणे : ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. राज्यात ऑगस्टमध्ये सरासरी २८०.३ मिमी पाऊस पडतो. किनारपट्टी, पश्चिम घाटाचा परिसर वगळता राज्याच्या अन्य भागात सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये देशभरात सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. देशात ऑगस्ट – सप्टेंबरमध्ये सरासरी ४२२.८ मिमी पाऊस पडतो. मोसमी पावसाच्या प्रमुख प्रभाव क्षेत्रात (मध्य भारत) सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज असला तरीही ईशान्य भारत, गुजरातमधील सौराष्ट्र, कच्छ, लडाख आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात देशात सरासरी २५४.९ मिमी पाऊस पडतो. ऑगस्टमध्येही सरासरीच्या ९४ ते १०६ टक्के पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये किनारपट्टी, घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याचा परिसर आणि दक्षिण मराठवाड्यात सरासरी इतका किंवा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. पण, विदर्भ, उर्वरित मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पर्जन्य छायेचा प्रदेश, उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा – VIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

ला – निना महिनाअखेरीस सक्रिय होणार

प्रशांत महासागरातील एल -निनो पूर्णपणे निश्क्रिय झाला आहे. प्रशांत महासागरात सध्या तटस्थ अवस्था आहे. ऑगस्टअखेरीस ला -निना स्थिती निर्माण होण्यास सुरुवात होईल. ही ला -निनाची स्थिती हिवाळ्याच्या अखेरपर्यंत राहील. ला- निना स्थितीला पोषक वातावरण निर्माण झाले असून, या पोषक वातावरणाचा सकारात्मक परिणाम देशातील मोसमी पावसावर दिसून येत आहे. हिंदी महासागरातील द्विध्रुविता (आयओडी) तटस्थ असून, पावसाळा संपेपर्यंत तो तटस्थ अवस्थेतच राहण्याची शक्यता महापात्रा यांनी व्यक्त केली आहे.

जुलै महिना सरासरीपेक्षा उष्ण

जुलै महिन्यात देशातील तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले. जुलैमध्ये देशाचे कमाल तापमान सरासरी ३१.७९ अंश सेल्सिअस असते. यंदा ते ३२.३० अंश सेल्सिअस होते. कमाल तापमान सरासरी २४.१० अंश सेल्सिअस असते, ते २४.९९ अंश सेल्सिअसवर गेले होते. कमाल तापमान सरासरीपेक्षा ०.५१ आणि किमान तापमान ०.८९ अंश सेल्सिअसने जास्त राहिले. ऑगस्ट महिन्यातही देशाच्या बहुतेक भागात कमाल – किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा – उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक भाषणात आगपाखड दिसून येते : भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील

पाहिला आठवडा पावसाचा

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज आहे. किनारपट्टी, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याचा तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज, हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील चार – पाच वर्षांपासून ईशान्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडत असल्याचे निरीक्षण आहे. जुलै महिन्यात देशात मुसळधार पावसाच्या १०३० घटना घडल्या, तर अति मुसळधार पावसाच्या १९३ घटना घडल्या आहेत. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रातील काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.- डॉ. मृत्यूंजय महापात्रा, महासंचालक, भारतीय हवामान विभाग