साताऱ्याच्या सैनिकी शाळेमध्ये सहावीपासून दोघे मित्र.. देशाची सेवा करण्याच्या जिद्दीने त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश मिळवला.. तेथील खडतर प्रशिक्षण घेऊन अधिकारी म्हणून बाहेर पडताना दोघांनी सुवर्ण व कास्य पदक पटकाविले.. येथे ‘टॉपर’ बनतानाही त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही.. गेल्या नऊ वर्षांपासून एकत्र असलेले हे मित्र आता डेहराडून येथील इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये पुढील शिक्षणासाठी जाणार आहेत.
मनोजकुमार आणि सूरज इथापे अशी त्यांची नावे! मनोजकुमार याने सुवर्ण, तर इथापे याने कांस्य पदक पटकावले आहे. मनोजकुमार हा मूळचा आग्य्राचा. तो सहावीपासून साताऱ्यातील सैनिक शाळेत होता. तर, इथापे हा मूळचा वाई येथील आहे. त्याचे वडील संजय इथापे वाई जिल्हा बँकेत अधिकारी आहेत. इथापेही साताऱ्यातील सैनिकी शाळेत शिकत होता. सहावीत असताना त्या दोघांची ओळख झाली. दोघांनीही एनडीएमध्ये प्रवेश मिळविण्याच्या दृष्टीने अभ्यास केला. दोघेही एनडीएमध्ये दाखल झाले. तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे बालमित्र येथेही पहिल्या तिघांमध्ये आले.
याबाबत मनोजकुमार याने सांगितले, ‘देशातील सवरेत्कृष्ट सैनिकी संस्थेतून शिक्षण घेऊन मी बाहेर पडत आहे. साताऱ्याच्या सैनिकी स्कूलमध्ये मिळालेल्या शिक्षणाच्या बळावरच या ठिकाणापयर्ंत पोहोचू शकलो. माझे वडील जनार्दन यादव हे उत्तर प्रदेश पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल आहेत. सातारा सैनिकी शाळेत सहावी ते आठवी पर्यंत मराठी विषय बंधनकारक होता. शिक्षकांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकविल्यामुळे मी मराठी बोलू शकतो. मला इन्फन्ट्रीमध्ये जायचे आहे. एनडीएमध्ये प्रवेश घेतल्यानंतर पहिले सत्र फारच अवघड गेले. मात्र, त्यानंतर सर्व व्यवस्थित झाले. ही तीन वर्षे कधीच विसरणार नाही. सूरज आणि मी सहावीपासून एकत्र आहोत. दोघांचे क्षेत्र वेगळे असल्यामुळे आमच्यात कधीच स्पर्धा नव्हती. आम्ही चांगले मित्र आहोत. या ठिकाणाहून गेल्यानंतर एनडीएची कोल्ड कॉफी आणि स्टीपसी पुडींग याची आठवण येत राहील.
रौप्य पदक विजेता योगेस थामी याने सांगितले की, मी मूळचा उत्तराखंड येथील असून वडील लष्करातच सुभेदार आहेत. लहानपणापासूनच उडण्याची आवड होती. वायुदलाचे प्रशिक्षण घेण्यासाठी हैदराबाद येथे जाणार आहे. माझे शिक्षण नैनिताल जवळील घोडाखाल येथील सैनिकी शाळेत झाले. सैन्यात यावे म्हणून वडिलांचे बंधन नव्हते.
सूरज इथापे याने सांगितले की, संरक्षण क्षेत्रात करिअरला दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, अलीकडे संरक्षण क्षेत्रामध्ये अनेक बदल झाले आहेत. या क्षेत्रात पीएचडी, तंत्रज्ञान विषयक अभ्यास करण्यासाठी परदेशी जाण्याची सुद्धा संधी आहे. त्यामुळे संरक्षण क्षेत्र करिअरसाठी उत्तम आहे.