पिंपरी : महापालिकेच्या वतीने मोशी कचरा भूमीतील बायोमायनिंग प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णत्वास आला आहे. आठ लाख चौरस मीटर जुन्या कचऱ्याच्या बायोमायनिंगचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये अतिरिक्त १५ लाख चौरस मीटर कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मोशी कचरा भूमीतील २५ एकर जमीन मोकळी होणार आहे. त्याचा उपयोग घनकचरा व्यवस्थापन उपक्रम आणि नागरी विकास प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात दैनंदिन बाराशे टन कचरा निर्माण होतो. हा कचरा संकलित करून मोशी येथील कचरा भूमीत प्रक्रिया करण्याकरिता पाठविण्यात येतो. २५ एकर जागेत २३ लाख चौरस मीटर इतका जुना टाकलेला कचरा आहे. पालिकेने जुन्या कचऱ्याचे बायोमायनिंग करण्याचे काम हाती घेतले आहे. कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने बायोमायनिंग करताना तयार होणारे आरडीएफ सिमेंट बांधकाम कंपन्यांना देण्यात येत आहे. जैव माती शेती आणि उद्यानासाठी वापरण्यात येत आहे. राडारोडा सखल भागात जमीन समपातळीत करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

municipality keeping eye after removing the encroachment on Belpada hill
पनवेल : बेलपाडा टेकडीवरील अतिक्रमण हटविल्यानंतर पालिकेची नजर
trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

हेही वाचा…पिंपरी : पाणी काटकसरीने वापरा, महापालिकेचे गृहनिर्माण संस्थांना पत्र

‘बायोमायनिंग’ म्हणजे काय?

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार ‘बायोमायनिंग’ ही एक वैज्ञानिक पद्धत आहे. या पद्धतीनुसार उत्खनन, पृथक्करण, घन कचऱ्याचा पुनर्वापर आणि कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. हवा आणि सूर्यप्रकाश या नैसर्गिक घटकांच्या सहाय्याने कचऱ्यावर ‘बायोमायनिंग’द्वारे प्रक्रिया करण्यात येते. कालांतराने यातील जैविक कचऱ्याचे विघटन होते. उर्वरित कचऱ्याचे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले जाते. अविघटनशील कचऱ्यात धातूंचा समावेश असल्याने या कचऱ्याला मूल्य प्राप्त होते.

‘बायोमायनिंग’चे फायदे

जुन्या टाकलेल्या कचऱ्याने व्यापलेल्या जमिनीचा पुनर्वापर, ‘बायोमायनिंग’ ही एक पर्यावरणपूरक पद्धत आहे. यामुळे कचऱ्यातून मिळालेले उपयुक्त घटक धातू, खतांमुळे संसाधनांचा पुनर्वापर करण्यास मदत मिळते. कचऱ्यातून उपयोगात येणारा आरडीएफ (रिफ्यूज डिराइव्ह फ्यूल) कचरा जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी किंवा बागकामासाठी खत म्हणून केला जाऊ शकतो. मृदा प्रदूषण कमी होते. यामुळे जमिनीतील पाणी स्वच्छ राहण्यास मदत होते.

हेही वाचा…शरद पवार यांच्या खेळीबाबत उत्सुकता

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले, की ‘बायोमायनिंग’द्वारे पर्यावरण पुनरुज्जीवनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. प्रकल्पाचे काम झाल्यानंतर जुन्या ३० वर्षातील साठलेल्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार आहे. बायोमायनिंगचे दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यास २५ एकर जागा घन कचरा व्यवस्थापनाच्या इतर प्रकल्पांकरिता उपलब्ध होणार आहे.