पुणे-सोलापूर रस्त्यावर कवडी गावाजवळील पहिल्याच टोलनाक्यानंतर साधारणपणे एक किलोमीटरवर कवडी पाट गावाकडं जाणारा रस्ता आहे. शेतांमधून जाणारा हा रस्ता लहान असून, दोन-अडीच किलोमीटरवर रस्ता संपतो आणि आपण नदी किनाऱ्यावर येतो. इथं नदीत एक छोटा बंधारा बांधण्यात आल्यानं, पाणी अडून राहतं. नदीत पुण्याचा सर्व कचरा पाण्यावाटे येत असल्यामुळं, पाणी काळसर आणि दुर्गंधीयुक्त आहे. पण तरीही दर हिवाळ्यात पक्षीप्रेमी आवर्जून या ठिकाणाला भेट देतात.
सोलापूर रस्त्यावरून नदीकडं जाणाऱ्या या छोट्या रस्त्यावर दोन्ही बाजूला शेतं आहेत. मध्येच सोलापूरकडं जाणारा लोहमार्गही आडवा येतो. दोन्ही बाजूंच्या शेतांमध्ये ऐन हिवाळ्यात येणारे पाहुण्या पक्ष्यांपैकी यलो वॅगटेल (पिवळा धोबी) आपली शेपटी वर-खाली करत, शेतातील किडे, धान्याचे कण वेचत असतात. आजूबाजूच्या झाडां-झुडपांच्या शेंड्यांवर किंवा विजेच्या तारांवर पाईड बुशचॅट (गप्पीदास), बाया वीव्हर (सुगरण), लिटल ग्रीन बी ईटर (वेडा राघू), मॅगपाय रॉबिन (दयाळ), इंडियन रॉबिन (चिरक), रेड व्हेंटेड बुलबुल (लालबुड्या बुलबुल), रेड व्हिस्कर्ड बुलबुल (लालगाल्या किंवा शिपाई किंवा नारद बुलबुल), बार्न स्वॅलो (माळ भिंगरी), मलबार लार्क (मलबारी चंडोल), इंडियन रोलर (भारतीय नीलकंठ किंवा नीलपंख) ही मंडळी लक्ष वेधून घेतात.
हा रस्ता पुढं गावातून जातो आणि दोन वळणं घेतल्यानंतर थेट नदीजवळ पोचतो. रस्ता इथं संपतो, पण दुचाकीस्वारांना छोट्याश्या बंधाऱ्यावरून पलिकडं जाता येतं. नदीचा अलिकडचा किनारा खडकाळ आहे, तर पलिकडं बहुतेक दलदल असते. बंधारा ओलांडल्यानंतर उजवीकडं एक रस्ता जातो. त्या रस्त्यावर सुरवातीला थोडं जंगल आणि नंतर शेतं लागतात. पक्ष्यांची छायाचित्रं काढण्यासाठी पुण्याहून अनेकजण हिवाळ्यात इथं येतात. रविवार आणि सुटीच्या दिवशी तर इथं हौसे-नवसे-गवसे छायाचित्रकारांची तर जत्राच भरलेली असते.
बहुतेक छायाचित्रकार नदीच्या अलिकडच्या काठावरच असतात. काही जण कॅमॉफ्लाज कपडे घालून आलेले असतात. परंतु, अन्य मंडळी साध्याच कपड्यात असल्यामुळं, त्यांच्या कॅमॉफ्लाजचा फारसा उपयोग होत नाही. मात्र, या कपड्यांमुळं त्यांना पक्ष्यांच्या अधिक जवळ जाता येतं. इथं कायमच्या वास्तव्याला असणाऱ्या आणि हिवाळ्यातील पाहुण्यांमध्ये रूडी शेल्डक (ब्राह्मणी बदक), ब्लॅक विंग्ड स्टिल्ट (शेकाट्या), ग्रे हेरॉन (राखी बगळा), पर्पल हेरॉन (जांभळा करकोचा), नॉर्दर्न शॉव्हेलर (थापट्या), ग्लॉसी आयबिस (चमकदार शराटी), इंडियन ब्लॅक आयबिस (काळा शराटी), ब्लॅक हेडेड आयबिस (पांढरा शराटी), युरेशिअन स्पूनबिल (चमचा), इंडियन स्पॉट बिल्ड डक (प्लवर), कॉमन सँडपायपर (तुतवार), वुड सँडपायपर (ठिपकेवाला तुतारी), व्हाईट ब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या), लेसर पाईड किंगफिशर (बंड्या किंवा कवड्या धीवर), रिव्हर टर्न (नदी सुरय), इंडियन स्किमर (पाणचिरा), वायर टेल्ड स्वॅलो (तारवाली भिंगरी), हाऊस स्वॅलो (घर पाकोळी), इंडियन शॅग (भारतीय पाणकावळा), लिटल कॉरमोरंट (छोटा पाणकावळा), लिटल इग्रेट (गाय बगळा) हे पक्षी दिसतात.
आणखी छायाचित्रे पाहण्यासाठी क्लिक करा
नदीपलिकडच्या छोट्या जंगलातून जाताना स्कॅली ब्रेस्टेड मुनिया (ठिपकेदार मनोली), अॅशी ड्राँगो (राखी कोतवाल), व्हाईट बेलीड ड्राँगो (पांढऱ्या पोटाचा कोतवाल), ब्लॅक ड्राँगो (कोतवाल), लिटल ग्रीन बी ईटर (वेडा राघू), लाँग टेल्ड श्राईक (नकल्या खाटीक), बे बॅक्ड श्राईक (छोटा खाटीक), लिटल ब्राऊन फ्लायकॅचर (तपकिरी लिटकुरी), पर्पल सनबर्ड (शिंजीर), कॉमन हुप्पो (हुदहुद), व्हाईट वॅगटेल (पांढरा धोबी) आणि ब्लॅक काईट (घार) ही मंडळी दिसतात.
पाण्यात आणि नदी काठावर स्वच्छंदपणे बागडणारे पक्षी पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. परदेशांत पक्षीनिरीक्षणासाठी तिथल्या वन खात्यातर्फे खास सोयी करण्यात आलेल्या आहेत. आपल्याकडं मात्र तसा कोणताही प्रयत्न झालेला दिसत नाही. दक्षिणेकडील राज्यांत काही ठिकाणी अशा सोयी आहेत. कवडी पाट, भिगवण अशा ठिकाणीही वन खात्यानं सोयी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत.
– अरविंद तेलकर
arvind.telkar@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Birds at kavdi pat village near pune article by arvind telkar
First published on: 11-06-2015 at 01:15 IST