लष्कर परिसरातील बिशप शाळेत प्रवेश मिळवून देण्याच्या बहाण्याने भामटय़ाने पालकांना सतरा लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पालकांनी शाळेत प्रवेशासाठी तगादा लावल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी एका भामटय़ाला गजाआड करण्यात आले आहे.
बिशप शाळेचे मुख्याध्यापक जॉल जॉन एडविन (वय ४९, रा. लष्कर ) यांनी या संदर्भात लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एबेन सॅम्युअल पॉल (वय ३३, रा. कुमार होम, एनआयबीएम रस्ता, कोंढवा) याला गजाआड करण्यात आले. त्याचे आणखी कोण साथीदार आहेत का, या दृष्टीने तपास सुरू आहे.
आरोपी पॉल हा बिशप शाळेच्या परिसरात थांबयाचा. प्रवेशासाठी आलेल्या पालकांकडे तो शाळेत कामाला असल्याची बतावणी करायचा. त्याने दशरथ झोंबाडे याला शाळेच्या नावाने बनावट पत्र दिले. झोंबाडे हा प्रवेशाची कामे करतो, असे त्याने पालकांना सांगितले. २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पहिलीत प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने त्याने पालकांकडून पैसे उकळले. शाळेचे प्राचार्य फ्रँक फ्रिज यांच्या नावाने बनावट पत्र त्याने पालकांना दिले. गेले वर्षभर शाळेत प्रवेशासाठी चकरा मारणाऱ्या पालकांनी अखेर शाळेला या घटनेची माहिती दिली. शाळेच्या मुख्याध्यापकांनी पोलिसांकडे ही तक्रार दिली.
दरम्यान, पॉल याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस उपनिरीक्षक एन. के. कटके तपास करत आहेत. आरोपी पॉल हा एका कंपनीत सेल्समन आहे. आतापर्यंत चार पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला असून त्याला शाळेच्या नावाने बनावट पत्र कोणी करून दिले याचा शोध सुरू  आहे, असे उपनिरीक्षक कटके यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bishops school admission parents cheating
First published on: 25-01-2016 at 02:40 IST