पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी आणि शहर सरचिटणीस राजेश पांडे यांना डावलण्यात आले आहे. विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर विधान परिषदेसाठी प्रा. कुलकर्णी यांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र त्यावेळीही त्यांना संधी देण्यात आली नव्हती.  त्यांच्याऐवजी सांगलीचे संग्रामसिंह देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय राजेश पांडे यांच्या नावाचाही पक्षाने विचार केलेला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे पदवीधर मदरासंघाच्या निवडणुकीसाठी प्रा. कुलकर्णी, राजेश पांडे यांची नावे पहिल्यापासूनच चर्चेत होती. मात्र पक्षाकडून उमेदवारीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सांगत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उमेदवारीबाबत मौन बाळगले होते. सुरक्षित मतदारसंघ आणि भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना विधानसभेची उमेदवारी जाहीर झाल्यापासून प्रा. कु लकर्णी नाराज होत्या. विधान परिषदेसाठीही त्यांच्या नावाचा विचार करण्यात आला नव्हता. मात्र पदवीधर निवडणुकीसाठी संधी मिळेल, असे सांगितले जात होते.

बोराळकर यांना संधी

मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून शिरीष बोराळकर यांना संधी देण्यात आली आहे. बोराळकर हे भाजपचे जुने कार्यकत्रे व माजी प्रवक्ते आहेत. राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्याशी चांगले संबंध असलेल्या बोराळकर यांचे फडणवीस यांच्याबरोबरही निकटचे संबंध आहेत.या वेळी उमेदवारीसाठी विद्यार्थी चळवळीतील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी प्रवीण घुगे यांनी केली होती. त्यामुळे या वेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण विरुद्ध शिरीष बोराळकर अशीच निवडणूक होईल. अमरावती शिक्षक मतदार संघातून भाजपने नितीन धांडे यांना उमेदवारी मिळाली आहे.

पक्षाने जाहीर केलेल्या उमेदवारासाठी निवडणुकीत काम करीन. उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज नाही.

– प्रा. मेधा कुलकर्णी, माजी आमदार,भाजप

रुपाली पाटील-ठोंबरे मनसेच्या उमेदवार

मनसेकडून पुणे मतदारसंघात अ‍ॅड. रूपाली पाटील-ठोंबरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्ष स्थापनेपासून त्या मनसेत कार्यरत आहेत.

नागपूरमध्ये गडकरी समर्थकाला डावलले

नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक प्रा.अनिल सोले यांच्या ऐवजी भाजपने महापौर संदीप जोशी यांना संधी दिल्याने गडकरी यांना हा पक्षांतर्गत मोठा धक्का मानला जातो. जोशी महापौर आहेत. माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp candidature for deshmukh by defeating medha kulkarni abn
First published on: 10-11-2020 at 00:03 IST