पुणे : केंद्रीय वस्तू आणि सेवा करांच्या (जीएसटी) पुनर्रचना व अधिक सुसूत्रीकरण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच जनतेच्या जीवनशैलीला देखील नवी चालना मिळणार आहे, असा दावा भारतीय जनता पक्षाचे सहमुख्य प्रवक्ते विश्वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या बदलामुळे सामान्य माणूस, शेतकरी, मध्यम व लघु उद्योगक्षेत्र, मध्यमवर्गीय समाजघटक, महिला आणि युवावर्गाला फायदा होणार आहे. या सुधारणेमुळे नागरिक केंद्रीत उत्क्रांतीची सुरुवात झाली असून समाजाच्या अखेरच्या स्तरापर्यंतच्या प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावणार आहे, असे पाठक यांनी सांगितले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस रवींद्र साळेगावकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून २०१४ पर्यंत देशाच्या आर्थिक वाटचालीचा वेग संथ राहिला होता. या काळात भ्रष्टाचार आणि महागाई गगनाला भिडली होती. कर संकलनाची प्रक्रिया क्लिष्ट होती, अर्थकारणात पारदर्शकताही नव्हती. मात्र मोदी सरकारने हे ओळखून सुधारणांना बळ देणाऱ्या योजना आखल्या व त्यांच्या अंमलबजावणीवरही लक्ष केंद्रीत केले. त्यामुळेच आज देशातील २५ कोटी लोकसंख्या दारिद्र्यरेषेखालून बाहेर आली असून देशाची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे पाठक म्हणाले.