पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे. ३२ प्रभागांत १२८ सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे स्वबळावरच लढावे, असे प्रदेश नेतृत्वाला कळविले आहे. शहरातील चारही आमदार आणि संघटनाही स्वबळावरच लढण्यासाठी आग्रही असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापालिका निवडणुकीसाठीची प्रभागरचना तयार झाली आहे. महापालिकेने अंतिम प्रभागरचना राज्य शासनाला सादर केली आहे. या पार्श्वभूमीवर काटे म्हणाले, ‘२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने ७७ जागा जिंकत सत्ता मिळवली होती. यंदा भाजपने सर्वच जागांवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरात भाजपची संघटनात्मक ताकद मजबूत आहे. स्वबळावर लढण्याची शंभर टक्के तयारी झाली आहे. शंभरहून अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. प्रभागनिहाय दौरे सुरू आहेत. इच्छुकांशी संवाद साधला जात आहे. बुथप्रमुख, शक्ती केंद्र प्रमुखांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत.

आतापर्यंत शहर भाजपच्या वतीने महापालिका निवडणुकीच्या बाबतीत तीन सर्वेक्षण केले आहेत. त्यामध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळेल, असेच आकडे आले आहेत. त्यामुळे भाजपला बहुमत मिळेल यात शंका नाही. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या काही दिवसांपर्यंत पक्षाकडून सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्वेच्या आधारे निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच उमेदवारी दिली जाईल. वशिला, कोणाच्या जवळचा याचा विचार केला जाणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विचार करूनच पक्षप्रवेश

महाविकास आघाडीतील आणि महायुतीमधील घटक पक्षातीलही काहीजण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांचा प्रवेश करण्याबाबत पक्षातील सर्वांना विश्वासात घेऊन आणि विचार करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पाच जणांची समन्वय समिती

शहरातील पक्षाचे विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे दोन असे चार आमदार आणि पक्ष संघटनेत उत्तम समन्वय आहे. आमदार आणि शहराध्यक्ष अशी पाच जणांची एक समन्वय समिती स्थापन केली आहे. महापालिका निवडणुकीच्या तिकीट वाटपाचा अंतिम निर्णय समन्वय समिती घेणार असल्याचेही काटे यांनी सांगितले. महापालिकेची निवडणूक स्वबळावरच लढवावी असे स्पष्ट मत प्रदेश नेतृत्वाला कळविले आहे. आमदार आणि संघटनेचीही स्वबळावरच लढावे अशी भूमिका आहे. अंतिम निर्णय पक्ष नेतृत्व घेईल, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी सांगितले.