पक्षनेत्यांचेच नगरसेवकांवर शरसंधान, विरोधकांचा पलटवार

पिंपरी : भाजप नगरसेवकांच्या बेशिस्त वर्तनाची गंभीर दखल घेत िपपरी पालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी नगरसेवकांना पक्षातून काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे, नगरसेवकांच्या मिळकतींसह मॉल, मंगल कार्यालये आणि मोठय़ा मिळकतींचा मिळकतकर भरला जात नसल्याची शंका व्यक्त करत त्यांनी आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे. या पाश्र्वभूमीवर पक्षनेते कळसूत्री बाहुलीप्रमाणे कोणाच्या तरी सांगण्यावरून बेताल वक्तव्ये करत असल्याचा पलटवार विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.

भाजपमध्ये संघटनात्मक पातळीवर तसेच पालिकेच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून तीव्र धुसफूस सुरू आहे. खासगी वाटाघाटीद्वारे भूसंपादन करताना नुकसान भरपाई देण्याचे धोरण बदलण्याच्या विषयावरून पक्षातील मतभेद चव्हाटय़ावर आले आहेत. या वादामुळे भाजपला दोन वेळा सभा तहकूब करावी लागली.

या संदर्भात, पक्षातील नगरसेवकांना इशारा देणारे पत्रक पक्षनेत्यांनी प्रसिद्धीस दिले. त्यात नगरसेवकांना उद्देशून केलेल्या काही विधानांचे तीव्र पडसाद शुक्रवारच्या सभेत उमटण्याची शक्यता आहे. नगरसेवकांनी पालिकेचे नुकसान करू नये. नियमांचा गैरवापर करत काहींनी पालिका लुटण्याचा उद्योग सुरू केला आहे. मोठय़ा प्रमाणात मिळकतकराची चोरी होते. नगरसेवकच पाणीबिल आणि कर भरत नाहीत. महापालिकेची लूट करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. सत्ताधारी नगरसेवकासही पाठीशी घालू नये, असे पवारांनी म्हटले आहे.

महापालिकेच्या हिताला बाधा आणणाऱ्या नगरसेवकांना वेळप्रसंगी पक्षातून काढून टाकू. स्वत:च्या फायद्यासाठी सभागृह वेठीस धरणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महापालिका आणि महापौरांची प्रतिष्ठा प्रत्येक नगरसेवकाने जपलीच पाहिजे. – एकनाथ पवार, सत्तारूढ पक्षनेते

भाजपमधील अंतर्गत मतभेदांमुळे पक्षनेत्यांचा नाइलाज झाला आहे. त्यामुळे त्यांनाच सभा तहकूब करावी लागली. मात्र, खरे कारण न देता विरोधक गोंधळ घालतात, असा कांगावा त्यांनी चालवला आहे. – नाना काटे, विरोधी पक्षनेता