पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा धुव्वा उडाला. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा १० हजार ९५१ मतांनी पराभव करत भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. शिक्षक-पदवीधार मतदारसंघांतील निवडणुकीपाठोपाठ हा मोठा धक्का बसलेल्या भाजपला चिंचवड मतदारसंघातील अश्विनी जगताप यांचा विजय अंशत: दिलासादायक ठरला.

कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या दोन्ही निवडणुका भाजपने प्रतिष्ठेच्या केल्या. महाविकास आघाडीनेही या निवडणुकीत संपूर्ण ताकद पणाला लावली. राज्यातील सत्तासंघर्षांच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण राज्याचे लक्ष पोटनिवडणुकांच्या निकालाकडे लागले होते. कसब्यातील मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच रवींद्र धंगेकर यांना मिळालेले मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिले. भाजपच्या हक्काचे मतदान मानल्या गेलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार, नवी पेठ आणि कसबा पेठ या भागांतील मतेही रासने यांच्याऐवजी धंगेकर यांच्या पारडय़ात पडली. निर्णायक आणि हक्काची मते रवींद्र धंगेकर यांना मिळाल्याने त्यांचा १० हजार ९५१ मतांनी विजय झाला.

कसब्यातील दुरंगी लढत एकतर्फी ठरली. रवींद्र धंगेकर यांना ७३ हजार १९४, तर रासने यांना ६२ हजार २४४ मते मिळाली. धंगेकर यांच्या विजयाने कसब्यात ३५ वर्षांनंतर पहिल्यांदाच भाजपला या मतदारसंघात पराभूत व्हावे लागले आहे. चिंचवडमधील अटीतटीच्या लढतीत भाजपने चिंचवडचा गड कायम राखला. अश्विनी जगताप यांनी ३६ हजार १६८ मताधिक्याने चिंचवड मतदारसंघ राखला. त्यांना एकूण एक लाख ३५ हजार ६०३ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादीचे नाना काटे यांना ९९ हजार ४३५ मते मिळाली. ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी ४४ हजार ११२ इतकी मो घेत भाजपचा विजय सुकर केला. चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे सलग तीन वेळा निवडून आले होते. आता त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांच्या माध्यमातून जगताप कुटुंबाने चौथ्या विजयाची नोंद केली. काटे यांना दुसऱ्यांदा पराभव स्वीकारावा लागला. काटे यांच्या विजयात राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा अडसर ठरला.

विधानसभेत पडसाद

मुंबई : विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाचे पडसाद गुरुवारी विधानसभेतही उमटले. कसब्यातील निकालावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांना डिवचत आत्मचिंतनाचा सल्ला दिला. त्यावर, तीन राज्यांतील निकालात काँग्रेस कुठेच दिसत नाही. एखादा विजय तुम्हाला साजरा करावा लागतो, असा टोला फडणवीसांनी लगावला.

कसब्यातील जनादेशाचा आम्ही स्वीकार करतो. तेथील जनतेने आम्हाला थोडे कमी आशीर्वाद दिले. आपले आशीर्वाद मागण्यासाठी ‘आम्ही पुन्हा येऊ’. -देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

मतदार जागरुक

असल्याचे या निकालाने दाखवून दिले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदार अनेक वर्षांच्या भ्रमातून बाहेर पडला. आता देशातील मतदारांचाही भ्रम दूर होईल.

-उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री