‘संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’ अशा मागण्या करीत शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर मंगळवारी रोष प्रकट केला. शेतकरी संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष शरद जोशी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरील नेत्यांना या अनुभवाला सामोरे जावे लागले.
राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे. सरकारविरोधात त्यांच्यामध्ये असलेल्या तीव्र भावनांचा उद्रेक मंगळवारी शरद जोशी यांचे अंत्यदर्शन घेताना उफाळून आला. पंतप्रधान आणि केंद्र सरकारतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आलेले केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा या मागण्या केल्या. तर, स्वतंत्र भारत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र विदर्भ झालाच पाहिजे, अशा घोषणा दिल्या. शेतकरी आत्महत्या थांबतील आणि शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी लागेल तो क्षण हीच जोशी यांना श्रद्धांजली ठरेल, अशी भावना गडकरी यांनी व्यक्त केली.
पालकमंत्री गिरीश बापट, सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही याच अनुभवाला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे या मागणीच्या घोषणा दिल्या. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलून हे नेते एकाच गाडीमध्ये बसले. ‘दादा तुम्हीच आमचे तारणहार. भाजपचे ‘बोलके पोपट’ शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत’, असे विधान करीत चक्क अजित पवार यांनाच एका कार्यकर्त्यांने साकडे घातले. दुष्काळ आणि गारपिटीने होरपळलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी विधानसभेच्या अधिवेशनात केली असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कांद्याला भाव मिळावा यासाठी आंदोलन करीत होतो. त्यावेळच्या खासदाराने हा प्रश्न ‘मॅडम’च्या कानावर घालतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्या नेत्याला शारीरिक इजा करू नये म्हणून मलाच त्या खासदाराच्या थोबाडीत ठेवून द्यावी लागली, अशी आठवण माधवराव मोरे यांनी सांगितली. त्या घटनेचे दु:ख आहे. पण, त्या खासदाराचा जीव वाचवावा म्हणून मला हे कृत्य करावे लागल्याचेही त्यांनी सांगितले.
– रामचंद्रबापू पाटील
शेतकऱ्यांना शेतमालाला रास्त दर मिळावा यासाठी काम करणाऱ्या सर्व संघटनांनी एका झेंडय़ाखाली एकत्र यावे. हीच शरद जोशी यांना खरी श्रद्धांजली ठरेल. या नेत्यांनी एकत्र यावे यासाठी शेतकऱ्यांनीच रेटा लावला पाहिजे.
– रघुनाथदादा पाटील
आम्हाला खरे शरद जोशी कळलेच नाहीत. कोणत्याही समाजव्यवस्थेमध्ये शेतकरी हाच निर्णायक घटक असला पाहिजे. सरकार कोणत्याही पक्षाचे असो, शेतकऱ्यांना रास्त दर मिळवून देण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
– राजू शेट्टी
गावाबाहेर मला कोणी ओळखत नव्हते. माझी राष्ट्रीय पातळीवरची ओळख ही केवळ शरद जोशी यांच्यामुळेच आहे. एरवी पुढाऱ्यांसमोर उभे राहायला घाबरणारी पोरं जोशी यांच्यामुळे प्रश्न विचारून लढा करू लागली आहेत.
– उदयनराजे भोसले
क्रांतिकारकांच्या सातारा जिल्ह्य़ात जन्मलेले शरद जोशी क्रांतिकारक न होतील तरच नवल. कृतिशील व्यक्तिमत्त्वाच्या जाण्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे. त्यांच्यामुळेच ‘नाफेड’ची निर्मिती झाली आहे. सरकारने जोशी यांचे उचित स्मारक उभारावे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2015 रोजी प्रकाशित
भाजप नेत्यांवर शेतकऱ्यांचा रोष
‘संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे’, ‘शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा’ अशा मागण्या करीत शेतकऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर मंगळवारी रोष प्रकट केला.
Written by दया ठोंबरे
First published on: 16-12-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp leaders farmers anger